इगतपुरी : पूर्व भागात भात कापणी अंतिम टप्प्यात; रब्बीसाठी शेतकरी सज्ज

इगतपुरी : पूर्व भागात भात कापणी अंतिम टप्प्यात; रब्बीसाठी शेतकरी सज्ज

इगतपुरी : तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची भात कापणी शेवटच्या टप्प्यात असून लवकरच रब्बी पिकांच्या कमला वेग येणार आहे.

दरम्यान जिल्हाभरात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले. असेंक पिकांचे नुकसान झाले. यामध्ये अंतिम टप्प्यातील भात कापणीसाठी आलेले भाताचे पीक शेतात पाणी असल्याने सोडून गेले. परिणामी उत्पादनावर परिणाम झाला. यातून उभारी घेतलेल्या भातपिकांची सध्या कापणी सुरु असून मजुरांद्वारे काम करावे लागत आहे. यासाठी भात कापणी यंत्राचा वापर न करता २५० रुपये रोज व एक वेळेचे जेवण व जेवण न देता ३०० रुपये कोरडा रोज देऊन रोजंदारीने मजूर आणून हाता तोंडाशी आलेली भात सोंगनी करावी लागली.

काही ठिकाणी अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे अतोनात नुकसान केले. यामध्ये शेतकऱ्यांना द्राक्ष बागा तोडाव्या लागल्या. उरलेल्या द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकरी जीव ओतुन प्रयत्न करीत आहेत. दिवसाची सुरवात होण्याआधीच औषध फवारणीच्या कामकाजाला सुरवात केल्याचे दिसुन येत आहे .रात्री उशिरापर्यंत शेतकरी शेतात पिकांकडे लक्ष देवून असतात. परतीच्या पावसाने शेतीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झालेले आहे .

अनेक भागांत भौगोलीक रचनेनुसार खरीप हंगाम जोरात होत असला तरी रब्बी मात्र जोरदार होत नाही. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने प्रथमच रब्बी हंगाम जोरात सुरु झाला आहे. रब्बी हंगामात गहु, हरभरा, कांदे ही प्रमुख नगदी पिके घेतली जातात. यंदा पाऊस चांगला पडल्यामुळे रब्बीतही भाजीपाला फळभाज्या घेण्यास शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. अवकाळी पावसाने उन्हाळ कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कांद्यासाठी शेती पडून राहण्यापेक्षा अनेक शेतकरी गहु, हरभरा या पिकांना पसंती देत आहेत.

भात शेतीत ओलावा व पाणी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भात कापणी, हारवेस्टर मशीन ऐवजी प्रती मजूर २५० रुपये रोज व एक वेळेचे जेवण,जेवण न देता ३०० रुपये कोरडा रोज देऊन रोजंदारीने भात सोंगनी व भातशेतीची कामे करावी लागली.
– सतिश बांबळे टाकेद

“यंदा अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला असला तरी रब्बीसाठी जोरदार तयारी करीत आहे. अवकाळी पावसाने भातशेतीचे अतोनात नुकसान केले असले तरी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, उन्हाळ कांदा, तसेच इतर भाजीपाला पिकवणायसाठी शेतकरी सज्ज झाला आहे.
– दिलीप बांबळे, शेतकरी, टाकेद बु.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com