पतीचा खून करणार्‍या पत्नीस जन्मठेप; इगतपुरी येथे २०१७ मध्ये घडला होता प्रकार
स्थानिक बातम्या

पतीचा खून करणार्‍या पत्नीस जन्मठेप; इगतपुरी येथे २०१७ मध्ये घडला होता प्रकार

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

पतीचे इतरत्र अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून रात्री झोपेतच पतीवर कोयत्याने वार करून खून करणार्‍या आरोपी पत्नीला जिल्हा व सत्र न्यायालयाचेे न्यायधीश एस. टी. पांडे यांनी जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सायना ऊर्फ शहाजान सगीर शेख (40, रा. नवा बाजार, पटेल चौक, इगतपुरी) असे आरोपीचे नाव आहे. सदरची घटना 12 जानेवारी 2017 रोजी रात्री इगतपुरीतील पटेल चौकातील घरात घडली होती. सगीर इस्माईल शेख (54) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुलगा कफिल शेख याच्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

12 जानेवारी 2017 रोजी रात्री शेख कुटुंबियांचे जेवण झाल्यानंतर कफिल शेख हा बाहेर निघून गेला होत, तर सगीर शेख हे जेवण करून पलंगावर झोपले होते. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आरोपी पत्नी सायना शेखने पती सगीर शेख याचे दुसरीकडे अनैतिक संबंध असल्याचा मनात संशय धरून तीक्ष्ण कोयत्याने डोक्यात, मानेवर वार करीत खून केला.

त्यानंतर कोयता नळाखाली धुवून तो बारा बंगला परिसरातील करंजीच्या झाडांमध्ये फेकून दिला होता. दुसर्‍या दिवशी मुलगा कफिल सगीर शेख घरी आल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मुलाने इगतपुरी पोलिसांत आईविरुद्ध तक्रार दिल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश मांडवे यांनी गुन्ह्याचा तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायधीश एस. टी. पांडे यांच्यासमोर चालला. न्यायालयासमोर आलेल्या साक्ष, पंच, वैद्यकीय पुरावे आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्या. एस. टी. पांडे यांनी आरोपी सायना शेख हिला जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास दोन महिने कारावास भोगावा लागेल. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. योगेश कापसे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक सय्यद, हवालदार वझरे यांनी पाठपुरावा केला.

Deshdoot
www.deshdoot.com