Photo Gallery : डोक्यावर गाठोडाभर संसार, वृद्ध, लहानग्यांसह हजारोंच्या संख्येने जत्थे निघाले उत्तरेला

Photo Gallery : डोक्यावर गाठोडाभर संसार, वृद्ध, लहानग्यांसह हजारोंच्या संख्येने जत्थे निघाले उत्तरेला

नाशिक । प्रतिनिधी

करोनाने जगभरात थैमान घातले असुन दररोज हजारो नागरिकांचा मृत्यु होत आहे. मुंबईतील रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊन एका अनामिक भितीमुळे मुंबई, ठाणे, पुणे येथील परप्रांतीय मजुर – कामगारांनी पदयात्रा करीत आपल्या घराचा रस्ता धरला आहे.

मुंबई – आग्रा महामार्गावर वृध्द, बालक, महिलांची मोठी गर्दी दिसुन येत असुन कडक उन्हाचा चटका सहन करीत मजल दरमजल करणार्‍या प्रवाशी मजुरांचे मोठी हेळसांड सुुरू आहे. परप्रांतीय मंजुरांना गावी जाण्यास परवानगी देणार्‍या शासनाकडुन त्यांना गावी जाण्यासाठी सोय केली नसल्याची या मजुरांत प्रचंढ संताप व्यक्त केला जात आहे.

करोनाचा प्रादुर्भाव मुंबई, पुणे, ठाणे या शहरात वाढत असुन मृत्युचा आकडा देखील वाढत आहे. यातच तिसर्‍या टप्प्यात वाढलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या परप्रांतीय मजुर – कामगारांची उपासमार सुरू झाली आहे.

मुंबईसह राज्यातील अनेक भागात लॉकडाऊनमुळे अडकुन पडलेल्या या मजुरांना आपल्या राज्यात परत जाण्याची सवलत केंद्र सरकारने दिली. मात्र त्यांनी उत्तर भारत, ईशान्य भारत, दक्षिण भारत व इतर ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे अथवा बसेसची व्यवस्था केलेली नाही.

तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने मालवाहक वाहनांत केवळ दोन जणांना परवानगी दिली असल्याने या मजुरांना आपल्या राज्यात – गावात जाण्यास कोणतेही साधन नाही.

या कारणास्तव राज्यातील लाखो परप्रांतीय मजुर कुटुंबांनी पायी प्रवासाला प्रारंभ केला आहे. मुंबई, ठाणे व पुण्याकडुन उत्तरेत निघालेल्या या मजुरांनी मुबई – आग्रा महामार्गाने चालण्यास प्रारंभ केला असुन गेल्या पंधरा दिवसापासुन या मार्गावर उन्हाच्या तीव्रतेपासुन वाचन सायंकाळी, रात्री, पहाटे आणि दिवसभर असा प्रवास सुरु केला आहे.

यात वृध्द, तान्हे बाळ घेऊन जाणार्‍या महिला, चार पाच वर्षाची बालके उन्हाचे चटके सहन करीत रस्त्याने चालतांना दिसत आहे. डोक्यावर संसाराचे गाठोडे, पाठीवर कपड्याची पिशवी व हातात लहान मुलांना ओढत घेऊन जाणारे पालक असे मनाला सुन्न करणारे चित्र शहरात महामार्गावर दिसत आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लागु झालेल्या लॉकडाऊनची सर्वात मोठी झळ या परप्रांतीय मजुरांना बसली आहे. परराज्यात आजारी पडण्याच्या भितीने पदयात्रा करीत निघालेल्या या मजुरांना घरची ओढ लागली असुन दररोज पन्नास कि. मी. पायी प्रवास करीत असलेल्या मजुरांनी आपण घरी किती दिवसात पोहचू याचे गणित मांडले आहे.

शहरी भागात सामाजिक संस्थांच्या मदतीने जेवण, नाश्ता व पाण्याची सोय होत असली तरी ग्रामीण भागात मात्र या कुटुंबांना बिस्कीट व पाण्यावरच दिवस काढावे लागत आहे. तीव्र उन्हाचे चटके बसु लागले कि ही मंडळी रस्त्यालगत झाडांची किंवा घरांची सावली पाहत काही वेळ विश्रांती घ्यावी लागत आहे. अशाप्रकारे संसार पाठीवर घेऊन निघालेल्या मजुर – कामगार, त्यांच्या कुटुंबाची किव सरकारला कधी येणार ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

सामाजिक संस्था, दानशुरांचा आधार पण…

महामार्गावर परप्रांतीय मजुर – कामगारांचे घोळकेच्या घोळके जातांना दिसत असुन त्यांची हेळसांड पाहत त्यांच्या मदतीला अनेक सामाजिक संस्था व दानशुर पुढे आले आहे. जेवण, फळे, नाश्ता, पाण्याच्या बाटल्या, पाणी देण्यासाठी अनेक ठिकाणी दानशुर मंडळी उभी आहे. एका ठिकाणी तर प्रवासात आजारी पडल्यास त्यांच्यावर उपचार केले जात आहे.

एका व्यक्तीने एकाच वेळी अनेकांचे मोबाईल चार्ज करण्याची व्यवस्था केली आहे. तसेच पायी प्रवास करतांना चपला तुटल्यास दिनवाणी पायी जाणार्‍यांना चपला देण्याची व्यवस्था एका ग्रुपने केली आहे. अशाप्रकारे मानवतेच्या मदतीला अनेक जण धावुन तात्पुरता दिलासा देत आहे. मात्र सरकारकडुन या लोकांना आपल्या जाण्याची कोणतीही सुविधा करण्यात आलेली नाही.

दररोज 7 – 8 हजार मजुर उत्तरेकडे रवाना

केंद्र शासनाने परप्रांतीयांना आपल्या गावी जाण्यास मुभा दिल्यानंतर आत्तापर्यत नाशिक शहरातील महामार्गावर सुमारे 40 ते 50 हजार मजुर मालेगावच्या दिशेने रवाना झाले आहे. गेल्या दोन दिवसात ही गर्दी वाढली असुन दररोज 9 ते 10 परप्रातीय पायी जातांना दिसत असुन जिल्ह्यातील उन्हाची तीव्रता लक्षात घेता ही मंडळी ऊन कमी झाल्यावरच पायी चालत आहे. उन्हाची तीव्रता पाहत चांगली सावली पाहत याठिकाणी झोप काढल्यानंतर हे मार्गस्थ होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com