नाशिक शहरात डॉक्टर व हॉटेल चालक करोना पाॅझिटिव्ह; हॉटेल चालकाच्या संपर्कातील १८ जण रुग्णालयात दाखल
स्थानिक बातम्या

नाशिक शहरात डॉक्टर व हॉटेल चालक करोना पाॅझिटिव्ह; हॉटेल चालकाच्या संपर्कातील १८ जण रुग्णालयात दाखल

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमोन येथील पोलीस कर्मचाऱ्याचे वडील दगावले

नाशिक । प्रतिनिधी

शहरात आज दोन करोना बाधीत आढळुन आले असुन यात एक जण पंचवटीतील हॉटेल चालक असुन दुसरा ग्रामीण रुग्णालयात काम करणारे डॉक्टर आहे. या दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असुन यासंदर्भातील माहिती महापालिका आरोग्य विभागाकडे प्राप्त झाली असुन यासंदर्भातील सखोल माहिती घेण्याचे काम महापालिका आरोग्य व वैद्यकिय विभागाकडुन सुरू आहे.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या आज (दि.24) सकाळपर्यत 75 इतकी असतांनाच दुपारनंतर यात दोनची भर पडली आहे. यात पंचवटीतील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारालगत असलेल्या एका हॉटेल चालकांला करोना झाल्याची माहिती समोर आली आहे.

हा हॉटेल चालक पंचवटीतील दिंडोरीरोड भागातील महालक्ष्मी थिएटरच्या मागील भागातील रहिवाशी आहे. यांच्या संपर्कात आलेल्या 18 जणांना महापालिका आरोग्य व वैद्यकिय विभागाने ताब्यात घेऊन कोरंटाईन केले असुन अजुनही माहिती घेण्यात येत असल्याची माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली.

तसेच शहरात राहणारे आणि मालेगांव येथील सरकारी रग्णालयात काम करीत असलेल्या एका डॉक्टराला करोनाची लागण झाली आहे. हे डॉक्टर गेल्या आठ दहा दिवसापासुन मालेगांव येथे करोना रुग्णांना सेवा देत होते.

त्यांना त्रास झाल्यानंतर ते शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाले असुन त्यांना करोनाची बाधी झाल्याची माहिती महापालिकेला प्राप्त झाली असुन यांची अद्याप अधिकृत नोंद आलेली नाही. तरीही संबंधीत डॉक्टर ज्या भागात राहत आहे, त्या भागाची माहिती घेण्याचे काम महापालिकेकडुन सुरू झाले आहे.

शहरात आत्तापर्यत 7 डॉक्टर बाधीत

शहरात सर्वात प्रथम जिल्हा रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टराला करोना झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील एक फिजीशियन व एक सहा. जिल्हा चिकीत्सकांना करोना झाला होता. तसेच नाशिक पुर्व विभागात असलेल्या एका मोठ्या खाजगी रुग्णालयातील महिला डॉक्टर व एक डॉक्टर अशांना बाधीत रुग्णांच्या संपर्कातून करोना झाला होता. त्यानंतर आता शहरातील सातव्या डॉक्टराला करोना झाल्याचे समोर आले आहे.

संगमनेर तालुक्यातील पोलीसाच्या पित्याचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून नाशिक येथे उपचार घेत असलेल्या संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका रुग्णाचा आज पहाटे मृत्यू झाला. मृत्यू झालेली व्यक्ती नाशिक शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस सेवकाचे वडील आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी वयोवृद्ध असलेल्या या व्यक्तीला करोनाची बाधा झाली होती. त्यामुळे नाशिक शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. आणखी या रुग्णाच्या संपर्कातील संशयितांचा शोध सुरु असून त्यांनाही स्थानबद्ध केलेलं जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com