Blog : होळी रे होळी पुरणाची पोळी…होळी-होळीला एक-एक गौरी

Blog : होळी रे होळी पुरणाची पोळी…होळी-होळीला एक-एक गौरी

नाशिक | दिनेश सोनवणे

बागलाण तालुक्यातील होळीचा सण जरा वेगळा असतो. बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सर्वाधिक प्रमाण कोकणा समाजाचे आहे. तर इतर भागात मोठ्या प्रमाणात अहिराणी भाषिक मांडली वास्तव्यास आहे.  बहुसंख्य लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे तर अनेक भागाला वेगळे ऐतिहासिक महत्व आहे.

निसर्गातील बदलाला या ऋतूत प्रारंभ होत असल्याची याठिकाणच्या नागरिकांची भावना आहे. निसर्गातील विविध बदल, पानगळ सुरू असते, तर नव्याने पालवी फुटत असते. घरात नव्याने दाखल झालेल्या खरीप बाजरीची व आगावू लागवड झालेल्या रब्बीचे पिकही याकाळात निघून येतात. या धान्याची घरात पूजा केली जाते.

महाराष्ट्रात देखील होळी उत्सव आंनदाने, उत्साहाने साजरे करतात. आदल्या दिवसापासूनच होळी दहनासाठी लाकडे, झाडाच्या फांद्या जमविल्या जातात. काही ठिकाणी ही लाकडे चोरूनही आणली जातात. त्यावर रंगबिरंगी कपड्याचे तुकडे बांधले जातात.

सर्वजण झाडाच्या त्या फांदीला कापडाचा एक तुकडा बांधतो. ती फांदी कपड्यांच्या तुकड्यांनी पूर्णपणे झाकली जाते, नंतर तिला सार्वजनिक ठिकाणी गाडले जाते. त्याच्यावर गवत, वाळलेली लाकडे, गवर्‍या, केळी, इतर फळे रचले जातात. मुहूर्तावर होळीचे पूजन करून मुख्यत: पुरणपोळीचा नैवैद्य दाखविला जातो. नंतर होळीचे दहन केले जाते. दहन करताना ‘होळी रे होळी पुरणाची पोळी…’ अशी घोषणाबाजी केली जाते.

तसेच होळीच्या दिवशी सकाळपासूनच लगबग असते ती गोवऱ्या आणि वाळलेली लाकडे गोळा करण्याची. यासाठी घरातील एका सदस्याला जावे लागते.

आधी घरातील लहान मुलं प्रत्येक घरी जाऊन होळी होळी ला चार चार गौरया अशा घोषणा देऊन प्रत्येक घरातून गोवऱ्या जमा करायचे.  गेल्या काही दिवसांत यात बदल झालेला दिसून येत आहे. आता फारसे कुणी गोवऱ्या मागत फिरत नाही. तसेच अनेकजन आता देणग्या काढून विकतच गोवऱ्या शहरी बघत घेऊन येताना दिसतात.

दरवर्षी नित्यनेमाने होलिका दहन होते. घरी गोडधोड बनवून होळीला पारंपारिक उत्साहात नैवेद्य दिला जातो. होलिका पूजन पार पडले. महिला पारंपारिक वेशभूषेत होलिका पूजनासाठी घराबाहेर पडतात. शेतकरी उत्पन्न चांगले मिळावे यासाठी होळीला नवसदेखील करतात. यामध्ये नारळाची माळ, नारळाच्या वाट्याची माळ तसेच हारकडेदेखील होळीच्या रचताना होळीमध्ये टांगले जातात.

होळीला अग्नी दिल्यानंतर यातील खोबरे काढण्यासाठी मग अनेकांचा प्रयत्न असतो. अनेकांना यामुळे चटकेही खावे लागतात. मात्र, होळीतील गरम नारळ काढून हा प्रसाद प्रत्येकजण घरी नेत असतो. तर होळी पेटल्यानंतर राहिलेली राख अनेकजण जमिनीत टाकण्यासाठी घेऊन येतात.

एकूणच ग्रामीण भागात होळी म्हटली की, प्रत्येकासाठी आनंदाचा दिवस असतो. सर्वांच्या घरी त्या दिवशी नवचैतन्य असते. अनेकजन खास होळीसाठी सुट्टी काढून आपल्या गावी परतत असतात त्यामुळे गावाचा पाहुणा होळीच्या दिवशी घरी आल्यामुळे होळीचा आनंद द्विगुणीत होतो.

अशी आहे होळीची खरी आख्यायिका

पूर्वी राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे.

नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली.

होलिका हे तिचे नाव. ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले. आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले.

परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली. आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला.

थोडक्यात होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी हाच होळी साजरे करण्यामागचा उद्देश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com