Photo Gallery : सलग दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये ‘धुव्वाधार’!

Photo Gallery : सलग दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये ‘धुव्वाधार’!

नाशिक । प्रतिनिधी

मोसमी वारे राज्यभर सक्रीय झाले असून सलग दुसर्‍या दिवशी शनिवारी (दि.१३) शहर व जिल्ह्यात दमदार पावसाने सलामी दिली. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री ८ वाजेनंतर पावसाने अधिकच जोर धरला. शहर व उपनगरीय परिसरार कमी अधिक स्वरुपात पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला होता.

शुक्रवारी शहरात १०१ मिली मीटर पाऊस पडला होता. शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. वातावरणात उकाडा जाणवत होता. त्यामुळे नाशिककरांचे पावसाकडे लक्ष लागून होते.

हवामान विभागाने देखील उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशार दिला होत‍ा. सायंकाळनंतर शहर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

विजेचा कडकडाट व ढगाच्या गडगडाटासह पावसाने जोरदार बॅटिंग केली. प्रारंभी जोरदार सरी कोसळल्या. त्यानंतर मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळत होत्या.

रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे दुकानदार व वाहनचालकांची तारांबळ उडाली. रस्त्यावर पाण्याचे पाट वाहत होते. मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, रविवार कारंजा, शालिमार, फुलबाजार या मध्यवर्ती ठिकाणी पाणी साचल्याचे पहायला मिळाले.

गटारी तुंबल्याने रस्त्यावर पाण्याचे पाट वाहत होते. रात्री उशीरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. पावसाने उकाडा कमी होऊन वातावरण अल्हादायक झाले होते. नागरिकांनी पावसाचा सुखद गारवा अनुभवला.

गोदेच्या पाणी पातळीत वाढ

गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक होता. मागील दोन दिवसांपासून विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पावसाचे पाणी व धरणातून होत असलेला विसर्ग यामुळे गोदेच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. नदी काठावरील अनेक छोटी मंदिरे पाण्यात गेली. सलग दुसर्‍या दिवशी पूर सदृश्य परिस्थिती पहायला मिळाली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com