अहो काय नाशिककर, कशासाठी जीव धोक्यात घालता?
स्थानिक बातम्या

अहो काय नाशिककर, कशासाठी जीव धोक्यात घालता?

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

एकीकडे कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी सर्वत्र जनजागृती होत असताना गंगेकाठावर स्थित असलेले काही नाशिककर मात्र, गंगेची साफसफाई सुरु असताना गालातून तांबे, पितळ, लोखंड व पैसे जमा करण्यासाठी मोठी गर्दी करत असल्याचे दिसून आले आहेत.

या ठिकाणचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले, यानंतर इतर सुजाण नाशिककरांनी आगपाखड करत याठिकाणी अनावश्यक गर्दी करणाऱ्या नाशिककरांना चांगलेच धारेवर धरले आहे.

नाशिकमध्ये अजून कोरोनाची बाधा एकही रुग्णाला झालेली नाही. प्रशासनाकडून वेळोवेळी आवश्यक ती काळजी घेतली जाते आहे. मात्र, काही नाशिककर विनाकारण अनावश्यक गर्दी करत आहेत हे पूर्णपणे चुकीचे आहे.

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे नदीतील गाळ काढण्यासाठी महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले आहे. या गाळात तांबे, पितळ, लोखंड, पैसे, त्याचबरोबर मासे सापडतात. या वस्तू शोधण्यासाठी नदी पात्रातील गाळाच्या ढिगाच्या आजूबाजूला एकाच गर्दी केलेली दिसून आली.

एकीकडे महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना दुसरीकडे आपला जीव धोक्यात घालून हे नागरिक गोदा पात्रातील वस्तू काढण्यात मग्न असल्याचे दिसले. यामुळे आपल्याबरोबरच याठिकाणी जमलेल्या नागरिकांना इतरांची थोडीदेखील काळजी नसावी का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com