ना कुठला नियम..ना भीती…; शहरात किरणा दुकानांवरील गर्दी काही कमी होईना
स्थानिक बातम्या

ना कुठला नियम..ना भीती…; शहरात किरणा दुकानांवरील गर्दी काही कमी होईना

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक शहरात सध्या सर्वत्र नियमांची पायमल्ली करताना दिसून येत आहे. रविवार कारंजा परिसरातील किरणा व्यावसायिकांकडे अनेक नागरिक अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी येतात. याठिकाणी प्रचंड गर्दी होत असून कुठेही सामाजिक अंतराचे भान पाळले जात नसल्याचे दिसते आहे.

जिल्ह्यातील करोनाचे सावट गडद झाले आहे. दिवसेंदिवस रुगासंख्या वाढू लागली आहे. तरीदेखील नागरिकांना याची कुठलीही भीती नसल्याचे यातून दिसत आहे. रणरणत्या उन्हात अनेकजण किराणा माल घेण्यासाठी येतात. सावलीच्या शोधात सामाजिक भान विसरून थेट आडोशाला एकत्रित उभे राहताना नजरेस पडत आहेत.

किरणा व्यावसायिकांना सामाजिक अंतर ठेवून किराणा माल देण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. मात्र, अरुंद गल्ली बोळ आणि रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी यामुळे सामाजिक अंतराचा याठिकाणी फज्जा उडालेला दिसत आहे.

शहर पोलीस नियमित याठिकाणी बंदोबस्तावर आहेत. त्यांच्याकडून दुकानदारांना वेळोवेळी सूचनादेखील केल्या जातात. मात्र, नागरिकांची नाहक गर्दी दररोजच होत असल्यामुळे काहीसे याठिकाणी हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

शहराच्या कानाकोपऱ्यातून रविवार कारंजा येथे काही मंडळी किराणा खरेदी करण्यासाठी येतात. एका ग्राहकाला किरणा माल घेण्यासाठी किमान तास दीड तास वेळ जातो. यामुळे गर्दी दिवसभर वाढलेलीच असते. कितीही सांगितले तरी ग्राहक ऐकत नाहीत अशी ओरड काही दुकानदारांनी केली.

नागरिकांनी आपल्या आसपासच्या दुकानांतून किराणा मालासह अत्यावश्यक वस्तू खरेदी कराव्यात असे अनेकदा सांगूनदेखील नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. नाशिक शहरात रुग्ण कमी असले तरी मालेगावसारखी परिस्थिती ओढवून घ्यावयाची नाही. यामुळे नागरिकांनी संयम बाळगावा असे आवाहक केले जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com