काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहींना अभिवादन

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी (दि.2) पंचवटीतील काळाराम मंदिरात भिम अनुयायांची मोठी गर्दी केली होती. सकाळपासूनच येथे भिमसैनिकांनी मंदिराच्या पूर्व दरवाजाबाहेर असलेल्या सत्याग्रहाच्या कीर्तिमान शिलालेखावर पुष्प वाहून आदरांजली वाहिली. सोमवारी(दि. 2) या मंंदिर प्रवेश सत्याग्रहाला नव्वद वर्षे पूर्ण झाले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचा लढा उभारला होता. फक्त सनातनी हिंदूंनाच जागं करण्यासाठी नव्हे तर त्यावेळच्या सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि दलितांना, शोषितांना त्यांचे मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. 2 मार्च 1930 ला सुरू झालेला हा लढा पुढे पाच वर्ष चालला. प्रथम 29 डिसेंबर 1929 रोजी विहीतगावच्या चावडीत झालेल्या बैठकीमध्ये मंदिर प्रवेशाची घोषणा केली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अंगात नवचैतन्य संचारले. 2 मार्च 1930 रोजी नाशिकमध्ये आठ हजार समाज बांधव जमले होते. त्यांनी पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण चारही दरवाज्यांसमोर ठिय्या दिला होता. सत्याग्रहींचा जोश, दृढ निश्चय पाहून त्यांनी रामकुंड व राममंदिर जनतेसाठी खुले करण्याचे आश्वासन दिले.

तर दुसरीकडे काळारामांचा मंदिराजवळ सनातन्यांनी दगडफेक केली. त्यात बाबासाहेबांसह शेकडो अनुयायी जखमी झाले होते. परंतु कोणाही मागे न हटल्याने सरकारला अखेर सत्याग्रहींपुढे झुकावेच लागले. त्यामुळे अशा प्रकारे आपल्या जिवाची बाजी लावून बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना न्याय मिळवून दिला. जिवाची पर्वा न करता सत्याग्रह यशस्वी करणार्‍या गायकवाड यांची यानंतर वाजतगाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली. मोठ्या राजवाड्यातील जाहीर सभेत या धाडसाबद्दल त्यांना बेलमास्तर ही पदवी बहाल करण्यात आली होती.

या ऐतिहासिक घटनेला 90 वर्ष पूर्ण झाल्याने या सत्याग्रहातील सत्यागहींना अभिवादन करण्यासाठी शहरातील सामाजिक, राजकीय, व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी शिलालेखाजवळ पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

ना. आठवले याचीही आदरांजली
मंदिर प्रवेश सत्याग्रहानिमित्ताने सामाजिक न्याय व सशक्तीकरण केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनीही किर्तीमान शिलालेखास अभिवादन करुन पुष्प अर्पण केले. यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *