लासलगाव : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सात गावे बंद

लासलगाव : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सात गावे बंद

लासलगाव | वार्ताहर

कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लासलगाव पोलीस स्टेशन हददतील ५ गांवासह इतर दोन असे सात गांव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लासलगाव सह पिंपळगाव नजिक येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे.

लासलगाव पोलीस स्टेशन हददीतील पिंपळगाव नजिक येथे एका तरूणाची कोरोना व्हायरसची टेस्ट पोझिटिव्ह आली आहे. यापार्श्वभूमीवर हा तरुण परिसरातील कोणकोणत्या गावी पाव विकण्यासाठी गेला होता. याबाबतची माहिती मागविण्यात आली. तद्नंतर पिंपळगाव नजिक , लासलगाव , खडकमाळेगाव , कोटमगाव , धारणगाव वीर , व निफाड पोलीस स्टेशन हददतील नैताळे, सारोळे खुर्द तर पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशन हद्दीतील रानवड हे गावे कोरोना व्हायरस प्रार्दुभाव टाळण्यासाठी बंद ठेवण्यात आली आहेत.

खबरदारीची उपाय योजना म्हणुन सदर गावांना चारचाकी व दोनचाकी वाहनाने अथवा पायी मार्गाने नागरीकांनी येणे – जाणे पुर्णत बंद करण्यात आले आहे. नागरीकांनी घाबरून जावू नये पोलीसांना व प्रशासनास सहकार्य करावे तसेच कोणीही सोशल मिडीया अथवा इतर मार्गाने अफवा पसरवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

तपासणीचे काम आज दुसऱ्या दिवशी सुरूच

कोरोनाग्रस्त रूग्ण आढळुन आल्यानंतर दुसऱ्या दिवशीही जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे पिंपळगाव नजिक, लासलगाव सह सात गांवात तपासणी चे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मुबीन देशमुख निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस एस गावले यांच्या पथकाने १३०० घरातील रहिवाशांची आरोग्य तपासणी केली त्यात कमी धोक्याचे ३३ रुग्ण तर अधिक धोक्याचे ४ रुग्ण आढळुन आले.

चौघांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. लासलगाव व परिसरात आजही पुर्णपणे बंद होते किराणा दुकान भाजीपाला हेही बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. रस्त्यावर तुरळक वाहने वगळता अनावश्यक रस्त्यावर फिरणाऱ्यांना काठीचा प्रसाद पोलिसांनी दिला.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com