Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकमालेगावी पुन्हा पाच कोरोना पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झाली ४२

मालेगावी पुन्हा पाच कोरोना पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झाली ४२

मालेगाव | प्रतिनिधी

शहरातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असताना आज सकाळी दिलासादायक ४६ अहवाल निगेटिव्ह आले होते. शहरात कोरोना नियंत्रित होण्याच्या मार्गावर असतानाच आज सायंकाळी पुन्हा मालेगावमध्ये पाच रुग्ण बाधित आढळून आल्यामुळे मालेगावमध्ये चिंता वाढली आहे.  आजच्या वाढलेल्या आकडेवारीमुळे एकट्या मालेगावात ३७ रुग्ण कोरोनाबाधित आहेत तर जिल्ह्याची कोरोना बाधितांची संख्या ४२ वर पोहोचली आहे.

- Advertisement -

मालेगावमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर शहरात आरोग्य यंत्रणेकडून सर्व्हेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक भागात सर्व्हेक्षणाला विरोध होत असताना आरोग्य सेवकांकडून सर्व्हेक्षण केले जात आहे. दोन दिवसांपूर्वी या सर्व्हेक्षणात सहा रुग्ण संशयित आढळून आले होते. त्यांच्या घशाचे स्राव घेऊन धुळे येथे तपासणीला पाठविण्यात आले होते.

या नमुन्यांचे अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाले. यामध्ये एक रुग्ण निगेटिव्ह तर इतर पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये एक पुरुष तर चार महिलांचा समावेश आहे. चारही महिला २५ ते ५० वयोगटातील असल्याचे समजते. तर पुरुष ५५ वर्षीय असल्याची माहिती मिळाली आहे.

मालेगाव येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आज पॉझिटिव्ह आलेले रुग्णदेखील जवळचे नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे. कोरोना बाधित आढळून आलेल्या परिसरात आरोग्य सेवकांनी केलेल्या सर्व्हेक्षणात हे संशयित आढळून आले आहेत.

मालेगावमध्ये आता महापालिकेच्या रुग्णालयात एकूण २० (१९ बाधित आणि एक मृत्यू) तर सामान्य रुग्णालयात एकूण  ११ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

अद्याप मालेगाव महापालिकेच्या दवाखान्यातून पाठवलेले ४३ नमुन्यांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहेत. तर सामान्य रुग्णालयातील २४ नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहेत. हे अहवाल रात्री उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत प्राप्त होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. दुसरीकडे मालेगाव सामान्य रुग्णालयातून आतापर्यंत ७५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, मालेगाव येथील एक रुग्ण चाचणी सिद्ध होण्यापूर्वीच दगावला आहे. तर एक तरुणी मालेगावहून धुळे येथे उपचारार्थ दाखल झाली असताना तिचाही धुळ्यात मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या