Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमुलीवर अत्याचार; न्यायासाठी उपोषणकर्त्या पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न

मुलीवर अत्याचार; न्यायासाठी उपोषणकर्त्या पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक | प्रतिनिधी

मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्याची तक्रार ग्रामीण पोलीस दाखल करून घेत नसल्याने न्यायासाठी बापाने उपोषणाचा मार्ग अवलंबला. दरम्यान, घटनेनंतर चौथ्या दिवशी गुन्हा दाखल केला खरा मात्र, अत्याचार झालाच नसल्याचा दावा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला. यामुळे व्यथित झालेल्या पित्याने अखेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पित्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

सिन्नर तालुक्यातील एका मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. मात्र, संशयित मोकाट फिरत असून त्यांना अटक करण्याची मागणी मुलीच्या वडिलांनी केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याने मुलीच्या वडिलांनी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे उपोषणाचा मार्ग अवलंबला. विशेष म्हणजे, उपोषणाला बसण्यासाठी घरावरचे पत्रे या पित्याने विकले असल्याचे समजते.

दरम्यान पीडित मुलीच्या पित्याने आज संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हाताच्या नसा कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या या पित्याला तत्काळ जवळील रिक्षाचालकांनी उचलून जिल्हा रुग्णालयात दाखल केले दरम्यान त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच मुंबईनाका सरकारवाडा पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी उपचार सुरू असताना आपात्कालीन कक्षातून पीडित मुलीच्या त्याने हाताची सलाईन काढून फेकत कक्षाबाहेर घेऊन भिंतीवर डोके आपटून स्वतःला जखमी करून घेण्याचा प्रयत्न केला.

माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना पोलीस शिक्षा का करत नाही असा सवाल या पित्याने उपस्थित केला असून संशयित आरोपींकडून वारंवार धमकावले जात असल्याचेही यावेळी त्याने जोरात ओरडून सांगितले.

दरम्यान, याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीनुसार अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या