जाता-जाता देखील करता येणार ‘फास्टॅग रिचार्ज’; ‘एनसीपीआय’कडून भीम यूपीआयचा पर्याय 
स्थानिक बातम्या

जाता-जाता देखील करता येणार ‘फास्टॅग रिचार्ज’; ‘एनसीपीआय’कडून भीम यूपीआयचा पर्याय 

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी 

१५  डिसेंबरपासून देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर असणाऱ्या  टोल नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. नवीन नियमाप्रमाणे आता प्रत्येक छोट्या- मोठ्या वाहनावर फास्टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले असून त्यानंतर आता नॅशनल पेमेंट्स कॅर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने  ग्राहकांना फास्टॅगला रिचार्ज करण्यासाठी भीम यूपीआयचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे गरजेनुसार हा रिचार्ज करणे आता शक्य होणार आहे.

या सुविधेमुळे आता वाहन चालक चालू गाडीमध्ये देखील आपल्या फास्टॅगचे रिचार्ज करू शकणार आहे. त्यामुळे आता टोलनाक्यावर लागणाऱ्या लांब रांगा आणि गर्दीपासून सुटका होणार आहे. नॅशनल इलेकट्रॉनिक टोल कलेक्शन योजनेत ग्राहकांना  फास्टॅगचा चांगला अनुभव प्रदान करणे हे आमचे उद्दीष्ट आहे. आम्हाला विश्वास आहे की, या सुविधेमुळे टोल देयकासाठी ते एक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक माध्यम उपलब्ध करुन देण्यास सक्षम असतील असे एनपीसीआयच्या वतीने सांगण्यात आले आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई) ने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार विविध विक्री केंद्रांच्या माध्यमातून सुमारे १.१० कोटी फास्टॅग कार्डे जारी करण्यात आली  आहेत. दररोज सुमारे दीड ते दोन लाख फास्टॅगची विक्री महामार्ग प्राधिकरणाकडे पाहायला मिळत आहे. न्हाईच्या म्हणण्यानुसार रोजचे टोल कलेक्शन सुमारे ४६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तसेच फास्टॅग प्रणाली सुरू झाल्याच्या आठ दिवसांच्या आत फास्टॅगकडून टोल व्यवहाराची संख्या दररोज २४ लाखांवर पोहोचली आहे.

फास्टॅग म्हणजे नेमकं काय ?

डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात ५००  हून अधिक टोल प्लाझावर फास्टॅग लागू करण्यात आला आहे. आपल्या वाहनाच्या विंडस्क्रीनवर (समोरील काचेवर) फास्टॅग कार्ड लावावे लागेल. राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझावर बसवण्यात आलेले  कॅमेरे ते स्कॅन करतात. यानंतर आपल्या खात्यातून टोलची रक्कम आपोआप वजा केली जाते. यामुळे ग्राहकांना मोठी वाहन गर्दी आणि लांबच लांब लाईन यापासून सुटका मिळते.

Deshdoot
www.deshdoot.com