अतिरिक्त भारनियमनातून होणार शेतकऱ्यांची सुटका; सिन्नरच्या पूर्वेकडील वीजकेंद्रांच्या उच्चदाब तारा बदलण्यासाठी ७५ लाखांचा निधी

अतिरिक्त भारनियमनातून होणार शेतकऱ्यांची सुटका; सिन्नरच्या पूर्वेकडील वीजकेंद्रांच्या उच्चदाब तारा बदलण्यासाठी ७५ लाखांचा निधी

सिन्नर । वार्ताहर

जुनाट झालेल्या उच्चदाब वीजवाहक तारांमुळे सिन्नरच्या पूर्वेकडील पाच वीजकेंद्रांना अपेक्षित दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना निर्धारित वेळापत्रकापेक्षा अतिरिक्त भारनियमनाच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. गेल्या तीन वर्षांपासून महावितरणचे अधिकारी या जुनाट झालेल्या तारा बदलण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र निधीअभावी रखडलेल्या या कामासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा वार्षिक योजनेचे 50 लाख व आमदार निधीचे 25 लाख रुपये असा 75 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला असून लवकरच कमी कालावधीची निविदा काढून काम मार्गी लागणार आहे.

मुसळगावच्या उच्चदाब केंद्रातून सिन्नरच्या पूर्व भागातील शहा, देवपूर, वडांगळी, सोमठाणे व निमगाव सिन्नर या केंद्रांना वीजपुरवठा करण्यात येतो. यासाठी टाकण्यात आलेल्या उच्चदाब वाहिनीच्या तारा कमकुवत झाल्याने त्याद्वारे दाबाने वीजपुरवठा करावा लागत होता. परिणामी निर्धारित भारनियमनासोबतच विजेच्या खेळखंडोब्याला या भागातील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत होते. जुनाट झालेल्या वीजतारा बदलून घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार करण्यात येत होती. त्याबाबतचा प्रस्ताव देखील महावितरणकडून करण्यात आला होता. मात्र निधी उपलब्धीअभावी हे काम लांबणीवर पडले होते.

यासंदर्भात महिनाभरापूर्वी शेततकऱ्यांनी आमदार कोकाटे यांची भेट घेऊन वस्तुस्थितीकडे लक्ष वेधले होते. यासंदर्भात महावितरणचे अधिक्षक अभियंता दारोली, कार्यकारी अभियंता मनिष ठाकरे, उपकार्यकारी अभियंता खैरनार यांच्यासमवेत बैठक घेऊन या कामाचे सुधारित अंदाजपत्रक बनवण्याच्या सूचना कोकाटे यांनी केली होती. या कामासाठी 75 लाखांचे अंदाजपत्रक बनवण्यात आल्यावर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे जिल्हा वार्षिक आराखड्यातून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी कोकाटे यांनी केली.

मात्र जिल्हा योजनेतून 50 लाख रुपये देण्यास जिल्हाधिकऱ्यानी समर्थता दर्शवली. त्यात आमदार निधीतील 25 लाख देत हे काम त्वरित पूर्ण करण्याची सूचना कोकाटे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली. पाणी असूनही ते पिकांना देता येत नाही हे लक्षात घेत कमी मुदतीची निविदा काढून वीजतारा बदलण्यात याव्यात असेही यावेळी सुचवण्यात आले.

इंडिया बुल्स ते मानमोडापर्यंत नवीन 33 केव्ही वीजवाहिनी टाकलीय तर त्यावर 2 वीज उपकेंद्रे जोडली जातील. जुन्या वाहिनीवर राहिलेली 3 वीज उपकेंद्रे जोडण्यात येतील. असे केले तर पाचही उपकेंद्रे व्यवस्थित चालतील असे महावितरणच्या सर्वेक्षणात सुचवण्यात आले आहे. अधिकारी गेली तीन वर्षे निधी मिळावा पाठपुरावा करीत होते. .आमदार कोकाटे यांनी शेतकरी हीत लक्षात घेत जिल्हावार्षिक योजनेसह आमदार निधीची रक्कम महावितरणला उपलब्ध करून दिली आहे.

तीन वर्षांपासून उपकेंद्रांना वीजपुरवठा करणारी वीजवाहिनी कमकुवत झाल्याचे माहीत असल्याने तिचे काम करणे गरजेचे होते. प्रशासकीय पातळीवर यापूर्वीच दखल घेतली गेली असती तर आज उभे राहिलेले विजेचे संकट उदभवले नसते. आमदार कोकाटे यांच्या पुढाकारातून पूर्वेकडील गावांचा मोठा प्रश्न लवकरच सुटणार आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com