विज वितरण विरोधात शेतकर्‍यांचा आंदोलनाचा इशारा
स्थानिक बातम्या

विज वितरण विरोधात शेतकर्‍यांचा आंदोलनाचा इशारा

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

पाथरे । वार्ताहर

यावर्षी रब्बीच्या हंगामातील गहू हरभरा मका आदीसह डाळींबा सारखी नगदी पिके जोमात असून नैसर्गिक वातावरणही या पिकास पोषक आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा उंचावल्या आहेत. मात्र, पाथरे येथील वीज वितरण उपकेंद्रातून अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे मुबलक पाणी उपलब्ध असूनही पिकांना वेळेवर व पुरेसे पाणी देता येत नाही. त्यामुळे आपल्या अपेक्षांवर पाणी फिरते की काय याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

पाथरे परिसर नांदूर-मध्यमेश्वर उजव्या कालव्याच्या सिंचन क्षेत्रा खाली असून यंदा विहिरींना पाणीही भरपूर उतरले आहे. मात्र, अनियमित व कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने शेतातील उभी पिके वाया जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कमी दाबाच्या वीजेमुळे वीज पंप जळण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत आहे. येत्या दोन-तीन दिवसात वीज पुरवठा नियमित व योग्य दाबाने करण्यात यावा. अन्यथा शेतकरी कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र्र आंदोलन छेडतील असेे निवेदन पाथरे केंद्राचे उप अभियंता एच. एस. मांडगे यांना देण्यात आले आहे.

निवेदनावर माजी सरपंच मच्छिंद्र चिने, भाऊसाहेब नरोडे, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब घुमरे, दौलत चिने, सोपान नरोडे, अर्जुन खरात, वाल्मिक चिने, संजय नरोडे, संपत चिने, एकनाथ शिंदे यांच्यासह शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com