मधाऽऽऽ! तुम्ही फक्त श्वासाकडे लक्ष द्या…; पतीला मृत्युच्या दाढेतून बाहेर काढणारी ‘आधुनिक सावित्री’
स्थानिक बातम्या

मधाऽऽऽ! तुम्ही फक्त श्वासाकडे लक्ष द्या…; पतीला मृत्युच्या दाढेतून बाहेर काढणारी ‘आधुनिक सावित्री’

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिकरोड ।  संजय लोळगे

पोलीस दलातील अधिकारी म्हणजे जोखमीचे काम, आणि जोखीम उचलणे हेच जिवंतपणाचे खरे लक्षण असते. आपल्यातील क्षमतांचा सुयोग्य वापर करत, ध्येयाप्रती समर्पणाची भावना ठेवून, संकटांना भिडण्याचा धोका पत्करणार्‍या व राष्ट्रपती पदकप्राप्त, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्‍याची पत्नी असल्याचा सार्थ अभिमान तर आहेच!

त्यात आता आणखी भर पडलीय. पतीला रुग्णवाहिकेतून मुंबईकडे रवाना करताना, मधाऽऽऽ… फक्त श्वासाकडे लक्ष द्या. या माझ्या एका वाक्याने बलाढ्य संकटावर एकमेकांच्या विश्वासाच्या बळावर मार्ग काढला. असे भावनिक उद्गार आहेत नलिनी मधुकर कड यांचे.

धैर्य, संयम, सावधानता व सकारात्मक द़ृष्टीकोन या चतु:सूत्रीच्या जोरावर करोनाविरूद्ध यशस्वी झुंज देऊन सुखरूपपणे घरी परतणारे पोलीस अधिकारी मधुकर कड हे ठाण्यातील दाट लोकवस्तीच्या मुंब्रा पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नाशिकरोड येथे त्यांचे निवासस्थान. नाशिकमध्ये उपचार सुरू असताना पहिला अहवाल पॉझिटिव्ह आला.

त्यानंतरचे सर्व उपचार त्यांनी मुंबईत घेतले. या कालावधीत त्यांच्या पत्नी नलीनी यांनी दाखवलेले धाडस, निर्णयक्षमता, कौटुंबिक जबाबदारी आणि प्रखर आत्मविश्वास समाजाला दिशादर्शक ठरावा.

यमाच्या तावडीतून सत्यवानाला सोडवणारी सावित्री पूजनीय झाली. तद्वतच करोनाच्या महाभयंकर आजारातून पतीला सहीसलामत घरी आणणार्‍या त्यांच्या पत्नी नलीनी यासुद्धा आधुनिक सावित्री असून समाजासाठी त्या प्रेरणास्रोत ठरल्या आहेत. करोना महामारीला न घाबरता कड साहेबांनी दिलेली झुंज जेवढी प्रशंसनीय आहे, तेवढीच त्यांच्या पत्नीने या काळात त्यांना दिलेली साथ व दाखवलेला धीरोदात्तपणा दखलपात्र आहे.

20-22 दिवसांची ही थरारक आपबिती त्यांनी ङ्गदेशदूतफसमोर व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ङ्गङ्घरडत बसून खचून जाण्यापेक्षा धैर्याने या प्रसंगाला सामोरे जाण्याचे प्रथम निश्चित केले. कर्तव्यदक्ष पतीपेक्षा समाजहित जोपासणार्‍या एका सज्जन व्यक्तीला या आजारातून बाहेर काढण्याचा ठाम निर्धार केला व पुढील उपचारासाठी मी पतीला मुंबईला हलवण्याचे ठरवले.

तथापि, तसे करण्यासाठी असंख्य अडचणी होत्या. मात्र वेळ दवडण्यातही अर्थ नव्हता. अशावेळी मी ठाण्याचे पोलीस आयुक्त फणसळकर साहेब, सरंगल साहेब व नीता अंबानी यांच्याशी फोनवर संपर्क साधला. या सर्वांनी खूप मोलाचे सहकार्य केल्याने मी पतीला उपचारासाठी मुंबईला नेऊ शकले. या काळात प्रचंड मानसिक दडपण होते.

आध्यात्म, प्राणायाम, योगासन या बळावर प्रतिकारशक्ती वाढवण्यासह सकारात्मक द़ृष्टीकोनाला चालना मिळते, ही बाब विद्यार्थी दशेतच मनात खोलवर ठसली आहे. याच शस्त्रांच्या बळावर मला संकटकाळात कुटुंब सावरता आले. गुंडांवर दरारा असणारे कड साहेब जेव्हा करोनायोद्धा म्हणून घरी सुखरूप परतले तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते. अशावेळीसुद्धा आई, बहिण, मैत्रिण व सहचारिणीची भूमिका समर्थपणे पेलणार्‍या नलिनी ह्या आधुनिक सावित्रीच म्हणाव्यात!

या आजारात रुग्णाला एकटे ठेवले जाते. अशावेळी मानसिक आधाराची नितांत आवश्यकता असते. समोर मृत्यु दिसत असताना त्याचा पराभव करण्यात जीवनाचा अपार आनंद असतो. पत्नीच्या भक्कम व धीरोदात्त पाठबळामुळे करोनाला उंबरठ्यावरून परत पाठवू शकलो. शारिरीक क्षमता व प्रचंड आत्मविश्वास असल्याने करोनावर मात करणे सहजशक्य झाले. तथापि, या युद्धात अद़ृश्य आजाराशी लढताना शासनाच्या सूचना व नियमांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे.

मधुकर कड, पोलीस अधिकारी 

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com