जळगाव : करोना टेस्टसाठी आपत्कालीन प्रयोगशाळा सुरू
स्थानिक बातम्या

जळगाव : करोना टेस्टसाठी आपत्कालीन प्रयोगशाळा सुरू

Balvant Gaikwad

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात कोरोना टेस्टसाठी बुधवारी आपत्कालीन प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. यात पहिल्या दिवशी 12 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील चार नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर आठ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती रुग्णालयातील सुत्रांनी दिली.

आपत्कालीन प्रयोगशाळेतील छोट्या मशीनच्या सहाय्याने एकाच वेळी चार नमुन्यांची तपासणी करता येते. एका नमुन्यासाठी साधारणत: दोन ते अडीच तास लागतात. यात फक्त डिलेव्हरी पेशंट, दमा आदी रुग्णांच्या इमर्जन्सी पेशंटचेच स्वॅब घेवून ते प्राधान्याने तपासले जाणार आहेत.

मोठी प्रयोगशाळा लवकरच

आपत्कालीन प्रयोगशाळेनंतर आता सात दिवसांमध्ये कोरोना विषाणू संशोधन चाचणी प्रयोगशाळेचे काम पूर्ण होईल. या प्रयोगशाळेसाठी विदेशातून यंत्रसामुग्री प्राप्त झाली आहे. या प्रयोगशाळेसाठी सुमारे दोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यात एका नमुन्याच्या तपासणीसाठी साधारणत: चार तास लागतील. दिवसभरात सुमारे 100 नमुन्यांची तपासणी होऊ शकेल. त्यासाठी मुख्य 12 डॉक्टर व त्यांच्या इतर सहकार्‍यांची टीम कार्यरत राहील. ही तपासणी दिवसाप्रमाणे रात्री सुद्धा होणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅबची तपासणी प्रारंभी पुणे, नाशिकला व्हायची. तेथील रुग्ण संख्या वाढल्यामुळे धुळ्यातील प्रयोगशाळा सुरू झाली. सध्या धुळ्यात तपासणीसाठी नमुने पाठवण्यात येत आहेत. तेथेही संख्या जास्त झाल्यास काही नमुने औरंगाबादला देखील पाठवावे लागतात.

अहवाल मिळणार लवकर

जळगावात लवकरच अद्यावत प्रयोगशाळा सुरू झाल्यास संशयित रुग्णांचे अहवाल लवकर उपलब्ध होऊ शकतील. रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास तत्काळ औषधोपचार करता येईल. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैर यांचे मार्गदर्शन लाभत आहे, असेही रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com