लॉकडाऊनमुळे सुधारली नाशिकची हवा; गुणवत्ता निर्देशांक ११५ वरून आला २३ वर

लॉकडाऊनमुळे सुधारली नाशिकची हवा; गुणवत्ता निर्देशांक ११५ वरून आला २३ वर
Photo : Viru Kadam
सातपूर | प्रतिनिधी 
महाराष्ट्रात २२ मार्चपासून संचारबंदी लागू आहे. रस्त्यावर वाहने उतरवण्यास बंदी असून, सर्व उद्योग व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे सर्वच महानगरांमधील प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड घटले असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये नाशिकमधील हवेच प्रदूषणदेखील कमी झाले आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक ११५ वरून २३ वर आला आहे.
शहर पुर्णत:लॉकडाऊन असल्यामुळे शहरातीत हजारो वाहने घरातील पार्किंगमध्ये लावलेली आहेत. औद्योगिक वसाहतीत शुकशुकाट आहे. यामूळे आपोआपच शहरात पसरणारे वायू ध्वनी प्रदूषण मोठ्याप्रमाणात थांबलेले आहे.
त्याचा परिणाम निश्चितच नाशिकच्या प्रदूषणावर झाला असून मध्यंतरी नाशिकमध्ये हवेचे प्रदूषण असल्याची जी बोंब होत होती ती मात्र या बंदच्या काळात सुधारली आहे.
आजच्या घडीला नाशिकची हवा ही अतिशुद्ध झाल्याचे चित्र आहे. नाशिकमध्येही हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक २३ पर्यंत खाली आला आहे.
लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असतानाच पर्यावरणासाठी मात्र ही आनंददायी बाब आहे.
महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या वेब साईटवरील नोंदीनुसार, नाशिक शहरातील हवेमध्ये मार्चमध्ये धुलीकणांची संख्या अधिक होती. त्यामुळे मार्चच्या प्रारंभी हवेचा गुणवत्ता निर्देशांक ११५ होता. जगभर करोनाचा उद्रेक झाल्यानंतर उद्योगावर त्याचा परिणाम झाल्याने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात अनेक उद्योग बंद होते.
त्यामुळे १५ मार्चपर्यंत नाशिकमधील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ८५ पर्यंत खाली आला होता. दरम्यान, २२ मार्चपासून नाशिकमध्ये संचारबंदी लागू झाली असून रस्त्यावर वाहने उतरवण्यास बंदी आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना रस्त्यावर आणण्यास परवानगी नाही.
तसेच, सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींमधील सर्व कारखाने बंद आहे. यामुळे हवेच्या प्रदूषणाचा स्तर  झपाट्याने खाली  येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण मंडळ कार्यालयाकडील नोंदीनुसार तो 26 मार्चपर्यंत नाशिकमधिल हवेचा निर्देशांक २३ पर्यंत खाली आला असल्याची नोंद आहे. सध्याची संचारबंदी १४ एप्रिल पर्यंत राहणार असल्यामुळे हवेचा हा निर्देशांक आणखी खाली येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com