Video : संगीतात ताण कमी करण्याची ताकद! – डॉ. अविराज तायडे

Video : संगीतात ताण कमी करण्याची ताकद! – डॉ. अविराज तायडे

नाशिक | प्रतिनिधी

लॉकडाऊनला लोक कंटाळले आहेत. ताणतणाव वाढत आहे. संगीताच्या माध्यमातून हा ताण कमी होऊ शकेल का? ताण कमी करणारे राग आहेत का? याविषयी सुप्रसिद्ध गायक डॉ. अविराज तायडे यांची मुलाखत.

प्रश्न- लॉकडाउनच्या या काळात संगीत माणसांना तणावमुक्त करू शकते का?

उत्तर – संगीतात विलक्षण ताकद आहे. संगीत हा शब्दच कोणत्याही व्याधीवर फुंकर घालणारा आहे. संकट; दुःख; ताण; वेदना अशा कोणत्याही प्रसंगातून माणसाला बाहेर काढण्याची शक्ती संगीतात आहे. तणावग्रस्त माणसाला संगीत एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. आपल्या दिनचर्येत अनेक गोष्टी आपण संगीताला अनुसरूनच करतो. भारतीय शास्त्रीय संगीताचा इतिहास फार मोठा आहे. माणसाच्या आयुष्यातील संगीताची महती वर्णन करावी इतका मी मोठा नाही.

प्रश्न- ताण घालवण्यासाठी रागाची निर्मिती झाली आहे का?

उत्तर – हो तर! भृगु संहिता, चरक संहितेसह अनेक आयुर्वेद ग्रंथांमध्ये संगीताचे वर्णन केलेले आहे. माणसाच्या मनाच्या अवस्थेनुसार रागांची योजना या विषयाला धरून विपुल लेखन त्यात केलेले आहे. आयुर्वेदानुसार माणसाची वात, पित्त व कफ अशी अवस्था सांगितली जाते. तशीच संगीताचीही प्रकृती असते. माणसाच्या भावभावनांचे वर्णन रागांमध्ये केलेले आहे. संगीत ही प्रभावी पूरक उपचार पद्धती आहे. आयुर्वेदानुसार कोणत्याही व्याधीचे मन हे मूळ आहे. संगीताचे सूर मनाला प्रफुल्लित करतात. ‘ मन चंगा तो कठोती में गंगा ‘ असे म्हंटलेच जाते.

प्रश्न – असा एखादा राग सांगाल का?

उत्तर- दरबारी कानडा हा राग ताणतणाव कमी करतो. हा राग प्रभावीपणे गायला आणि त्याच भावनेने ऐकला तर शब्दशः १०-१५ मिनिटात तणावग्रस्त माणसे निवांत होतात. रिलॅक्स फील करतात. त्यांच्यावरचा ताण कमी होतो. या रागाच्या निर्मितीची कथा मोठी विलक्षण आहे. तानसेन हे अकबराच्या नवरत्नांपैकी एक होते. एकदा अकबर बादशाहने त्यांना स्वतःवरचा ताण कमी करण्यासाठी रागाची निर्मिती करण्यास सांगितले. यासाठी तानसेन यांनी जो राग निर्माण केला तोच हा राग ‘ दरबारी कानडा

प्रश्न – लॉकडाउनच्या या काळात कलावंत काय करत आहेत?

उत्तर- कलावंत अनेक गोष्टी करत आहेत. समाजमाध्यमांवर अनेक प्रयोग करत आहेत. त्यांचेही आयुष्य धकाधकीचे झाले आहे. त्यांना निवांत वेळ मिळाला आहे. त्याचा सर्जनशील उपयोग करत आहेत.

प्रश्न – कलावंत डॉ. अविराज तायडे या काळात काय करत आहेत?

उत्तर- सगळ्यात आधी मी माणूस आहे. शिक्षक, गृहस्थ आणि कलावंत अशा तीनही अवस्था मी या लॉकडाउनच्या या काळात भरभरून अनुभवतो आहे. मी पहाटे तीन वाजता रियाजाला बसतो. तो ७ वाजेपर्यंत चालतो. गृहस्थ म्हणून मी घरातील सगळी कामे करतो. भांडी घासतो. घर झाडतो. फरशी पुसतो. घरातील महिला किती काम करत असतात ते या काळात सगळ्यांनाच समजले आहे. शिक्षक म्हणून मी माझ्या विद्यर्थिनी आणि शिष्याना शिकवतो आहे. बंदिशी ध्वनिमुद्रित करून त्यांना पाठवतो. त्यांच्याशी बोलतो. एकंदरीतच काय तर, या तीनही अवस्थांचा मी मनापासून आनंद घेतो आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com