Blog : आजच्या नजरेतून- ‘आंबेडकर आणि लोकशाही…’
स्थानिक बातम्या

Blog : आजच्या नजरेतून- ‘आंबेडकर आणि लोकशाही…’

Mrunal Patil

सध्या सामाजिक आणि राजकीय लोकशाहीच्या यशापयशाबद्दल अनेकांच्या मनामध्ये शंकाकुशंकानी गर्दी केली आहे. लोकशाहीच्या चारही स्तंभांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. जनता सार्वभौम आहे, याची जाणीव या सर्वच स्तंभांना करून देण्याची वेळ आली आहे. यशस्वी लोकशाहीबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारांचा मागोवा…

लोकशाहीचेच दुसरे नाव बंधुभाव आहे. लोकशाही हा शासनसंस्थेचा प्रकार नसून प्राथमिक दृष्टिने एकत्रित जीवनाची ती पद्धती आहे. आपल्या बांधवाबद्दल आदराची आणि पूज्यतेची भावना किंवा दृष्टी ठेवणे असे तिचे तत्त्वतः स्वरूप असते. डॉ. आंबेडकरांच्या लोकशाही कल्पनेच्यामागे कायद्याचे अधिराज्य, नैसर्गिक हक्क, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही गतिमान तत्त्वे आहेत.

समाज बदलण्याचे सामर्थ्य त्यांच्या लोकशाही कल्पनेत दिसून येते. लोकशाही हा जीवनाचा मार्ग असतो, असेच ते समजत असत. काही घटनात्मक हक्क मिळाल्याने लोकशाहीचा पाया तयार होत नसतो, असे त्यांना वाटत होते. त्यांच्या लोकशाहीच्या कल्पनेमध्ये सामाजिकता आणि नीतिमत्ता हे दोन प्रमुख घटक होते.

राजकारणात भक्ती किंवा विभूतिपूजा म्हणजे अधःपतनाचा मार्गच असतो. परिणामी त्यामुळे हुकूमशाही प्रवृत्ती वाढते, असे आंबेडकरांनी म्हटले आहे. मात्र, श्रेष्ठ माणसांबद्दल कृतज्ञता असणे यात ते काहीच गैर मानत नसत. सामाजिक लोकशाहीचा पाया खंबीर केला तरच राजकीय लोकशाही टिकेल.

स्वातंत्र्य, समता व बंधुता या तीन जीवनतत्त्वातील एक तत्त्व गळाले तरी सर्व लोकशाहीचा हेतूच विफल झाल्यासारखे होते. राजकारणातील विशिष्ट लोकांचा दरारा व मक्तेदारी तसेच सामाजिक विषमता हे दृश्य पालटले पाहिजे. असे झाले नाही तर विषमतेची झळ लागलेला वर्ग राजकीय लोकशाहीचे कवच फोडून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा डॉ. आंबेडकरांनी घटना समितीत दिला होता.

भारतीय घटनेत आर्थिक लोकशाहीची कल्पना आंबेडकरांनी मांडली आहे. ज्यांना प्राथमिक अशा जीवनाश्यक गोष्टी मिळत नसतात अशांचे समाधान करण्यावर; तसेच त्यांना माणुसकीच्या दर्जापर्यंत आणण्यावरच भारतीय लोकशाहीचे यश अवलंबून आहे. जनतेला स्वातंत्र्य, मालमत्ता किंवा सुख यांचा हक्क मिळवून देण्यात संसदीय लोकशाहीला यश आले किंवा नाही हा चर्चेचा विषय आहे. सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकणार नाही. कारण त्या आडव्याउभ्या धाग्यांनीच लोकशाहीचे वस्त्र विणले जात असते, असा अभिप्राय आंबेडकरांनी व्यक्त केला आहे.

लोकशाहीचे रूप सतत बदलत असते. तिची वाढ आपोआप होत नसते. लोकशाहीची वाढ योग्य दिशेने व योग्य पद्धतीने होण्यासाठी तिची मशागत करावी लागते. लोकशाही यशस्वी होणे आवश्यक असेल तर तिचा पाया चांगल्या सामाजिक संबंधावर अधारलेला पाहिजे. दारिद्र्य, निरक्षरता व जातिभेद लोकशाहीला धोकदायक असल्याचे आंबेडकरांनी सांगितले आहे.

मानवी हक्क वापराबाबत समाजात भेदभाव असता कामा नये. तसे असल्यास सामाजिक व राजकीय लोकशाही नाकारल्यासारखे होईल. सामाजिक पाया मजबूत न करता राजकीय लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न करण्यात राजकरणी लोकांना अपयश आले, हे आंबेडकरांनी दाखवून दिले आहे.

समाजात खास अधिकार असलेल्या व खास अधिकार नसलेल्या लोकांतील फरक हा लोकशाहीशी विसंगत असतो, किंबहुना तो लोकशाहीस हानीकारक असतो. उच्च राजकीय उद्दिष्टे सामाजिक ध्येयाशी सुसंवादी असावीत, असा बाबासाहेबांचा कटाक्ष होता. सामाजिक ध्येय आणि राजकीय पद्धती यांच्या समन्वयाने तयार होणारी लोकशाही त्यांना अभिप्रेत होती.

वर्गविग्रहाच्या मागोमाग सामाजिकदृष्ट्या अलगपणा, अलिप्तता येते आणि त्यामुळे विशेष अधिकार असलेल्या वर्गात टोळीसदृश्य समाजविरोधी प्रवृत्ती निर्माण होते. समाजातील या दोन वर्गात असलेल्या विरोधाचा परिणाम व्यवहारात अत्यंत प्रतिकूल होतो. म्हणूनच वर्गीय समाज रचना ही यशस्वी लोकशाहीस मारक असल्याने डॉ. आंबेडकरांनी तिचा धिक्कार केला होता.

समाज दोन वर्गात विभागलेला असतो. पहिला वर्ग राज्यकर्ते व दुसरा प्रजा. राज्यकर्ते हे राज्यकर्त्या वर्गातूनच निर्माण होत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे यशस्वी लोकशाही विषयक विचार राजकरण्यांसहित प्रत्येक नागरिकांनी आचरणात आणले पाहिजे.

  • मृणाल पाटील
    बी.वाय.के.कॉलेज
Deshdoot
www.deshdoot.com