घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत १४५ रुपयांची वाढ; गेल्या ६ महिन्यातली सर्वात मोठी दरवाढ
स्थानिक बातम्या

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत १४५ रुपयांची वाढ; गेल्या ६ महिन्यातली सर्वात मोठी दरवाढ

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी 

विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीत आज सरकारने मोठी दरवाढ केली असुंन महागाईने त्रस्त जनतेला आणखी मोठा दणका  दिला आहे.

आज दि. १२ करण्यात आलेल्या घोषणेनुसार नाशिकमध्ये १४ किलोच्या सिलेंडरसाठी ग्राहकांना ७०५.५० रुपयांऐवजी आता ८५०.५० रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या सहा महिन्यातील हि सर्वात मोठी दरवाढ असून विनाअनुदानित सिलेंडच्या किमती तब्बल १४५ रुपयांनी वाढवण्यात आली आहे.

ही दरवाढ करताना अनुदानीत सिलेंडरसाठीची सबसिडी देखील वाढवून देण्यात आली असून ती १५३. ८६ रुपयांवरून  २९१.४८ रुपये इतकी करण्यात आली आहे. एका वर्षात १२ सिलेंडर साठी हि सबसिडी असणार आहे.

सामान्यांना महागाईचे चटके बसत असताना आता गॅस सिलेंडरच्या किमतीत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर दि.१ फेब्रुवारीला घोषित दरपत्रकानुसार घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती.

त्यावेळी केवळ व्यावसायिक वापराच्या किमतीची वाढविण्यात आल्या होत्या.मात्र, आज दि. १२ मोठा दणका देत सरकारने थेट १४३ पासुंन १५० रुपयांपर्यंत वाढ करून सर्वसामान्यांसोबतच गृहिणींना अर्थसंकल्प पश्च्यात मोठी भेट दिली आहे. जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर वाढल्याने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करावी लागत असल्याचे पेट्रोलियम कंपन्यांनी म्हटले आहे.

दि. १ जानेवारी रोजी गॅस सिलेंडरची किंमत १९ रुपयांनी वाढवण्यात आली होती. हि किंमत दि. १ फेब्रुवारीला कायम ठेवण्यात आल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आजच्या दरवाढीने जनतेचा मोठा भ्रमनिरस झाला असून गेल्या सहा महिन्यातील ही सर्वात मोठी दरवाढ ठरली आहे. आजच्या दरवाढीने दिल्लीत घरगुती सिलेंडरची किंमत ८५८.५० रुपये, मुंबईत ८२९.५० रुपये तर नाशिकमध्ये ८५०.५० रुपये इतकी झाली आहे. अनुदानित दरात वर्षाकाठी १२ सिलेंडर देण्यात येतात. या सिलेंडरच्या अनुदानात देखील २९१.४८ रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरात किंमतीतील चढउतार 

एप्रिल २०१९ मध्ये ४.४७ रुपयांनी वाढ होऊन अनुदानित सिलेंडरची किंमत ६९९.१० रुपये झंझाली होती. त्यानंतर मे (५.९० रुपये), जून (२५ रुपये) महिन्यात वाढलेल्या किमतीत जुलै (१०० रुपये), ऑगस्ट (६२.५० रुपये) घट झाल्याने सामान्यांना मोठा दिलासा मिळाला होता. पुन्हा संप्टेंबर ( १५.५० रुपये), ऑक्टोबर (१३ रुपये), नोव्हेंबर (७६.५० रुपये), डिसेंबर ( १४ रुपये), जानेवारी (१९ रुपये) अशी सतत दरवाढ करण्यात आली होती. गेल्या सहा महिन्यातील दरवाढीचा विचार करता या महिन्यात १४५ रुपयांची विक्रमी वाढ घरगुती सिलेंडरच्या किमतीत झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com