शिवसेनेतील शहकाटशहात शिंदे यांची बाजी

शिवसेनेतील शहकाटशहात शिंदे यांची बाजी

पाऊलबुधेही विजयी : नियोजन समितीच्या निवडणुकीत शिवसेनेसह इतर पक्षांचीही मते फुटल्याची चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी)-  शिवसेनेतील शह-काटशहच्या राजकारणात शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांनी उपनेते माजी आ. अनिल राठोड यांना शह देण्यात यश मिळविले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्याच राठोड समर्थक असलेल्या अमोल येवले यांचा त्यांनी तब्बल 42 मतांनी पराभव केला.

दुसर्‍या जागेवरही शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा जाधव यांना पराभव स्वीकारावा लागला असून, येथे राष्ट्रवादीचे विनीत पाऊलबुधे 33 मतांनी विजयी झाले. या निवडणुकीत शिवसेनेसह अन्य पक्षांचीही मते फुटल्याची चर्चा आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक झाली. त्यातील तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यात महापालिका क्षेत्रातील एका जागेचा समावेश होता. यामध्ये भाजपच्या आशा कराळे बिनविरोध निवडून आल्या. याच क्षेत्रातील सर्वसाधारण आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग या दोन जागांसाठी निवडणूक झाली.

त्यासाठी मंगळवारी (दि. 24) मतदान होऊन गुरुवारी (दि. 26) मतमोजणी झाली. या दोन्ही प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील सैनिक संकुल येथे झाल्या. महापालिकेत एकूण 68 नगरसेवक असून, त्यापैकी एकाचे पद रद्द झाल्याने सर्व 67 नगरसेवकांनी या निवडणुकीत मतदान केले. मतदानाची प्रक्रिया पसंती क्रमांक टाकून होती.

अनेक नवीन नगरसेवक असल्याने यामध्ये सर्वसाधारण जागेसाठी झालेल्या मतदानात पाच आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी झालेल्या मतदानात चार मते बाद ठरली.

सर्वसाधारण जागेवरील निवडणुकीत अनिल शिंदे यांना 52 तर अमोल येवले यांना 10 मते मिळाली. यात 5 मते बाद ठरली. हे दोन्ही उमेदवार शिवसेनेचे नगरसेवक आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेवरील निवडणुकीत राष्ट्रवादीचे विनीत पाऊलबुधे यांना 48 तर शिवसेनेच्या सुवर्णा जाधव यांना 15 मते मिळाली. निवडून येण्यासाठी 32 मतांचा कोटा आवश्यक होता. पहिल्याच राउंडमध्ये तो पूर्ण झाल्याने शिंदे आणि पाऊलबुधे यांना विजयी घोषित करण्यात आले.

महापालिकेत शिवसेना (23), राष्ट्रवादी (18), भाजप (14), काँग्रेस (5), बसप (4), समाजवादी पक्ष (1) आणि अपक्ष (2) असे पक्षीय संख्याबळ आहे. शिवसेनेच्या उमेदवारांना पडलेली मते पाहता या पक्षातील मते मोठ्या प्रमाणात फुटल्याचे मानले जाते. मात्र मतमोजणीनंतर झालेल्या चर्चेमध्ये मात्र केवळ एकट्या शिवसेनेतच नव्हे, तर इतर पक्षातील मतेही फुटल्याचे बोलले जात होते.

सुवर्णा जाधव यांना मिळालेल्या मतांमध्ये शिवसेनेसह इतर काही पक्षांचीही मते असल्याचे बोलले जाते. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, बसप यांच्या मतांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. मतदानाच्या दिवशी या काही मतदारांनी तसे मान्य केल्याचे सांगण्यात आले. याचाच अर्थ शिवसेनेतील मतदान फुटले असले तरी इतर पक्षांतील मतांमध्येही काही प्रमाणात का होईना फूट पडल्याचे मानले जाते.

झाकलेली मूठ उघडली
विधानसभा निवडणुकीत पक्षाचे काम केले नसल्याचे सांगत शिवसेनेत काही नगरसेवकांवर संशय घेतला जात होता. त्यात अनिल शिंदे यांच्या पक्षनिष्ठेवर नाव घेऊन आक्षेप नोंदविला होता. तेव्हापासून शिंदे आणि राठोड यांच्यातील अंतर वाढले होते. नियोजन समितीच्या निवडणुकीत शिंदे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेकडून अमोल येवले यांचा अर्ज ठेवल्याने ही लढत शिंदे विरूद्ध उपनेते राठोड यांच्यात असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळेच या जागेवर कोण बाजी मारणार, याची उत्कंठा होती. शिंदे यांनी राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, बसप यांना जवळ करतानाच शिवसेनेतील नगरसेवकांनाही जवळ केल्यामुळे त्यांच्या पाठीशी शिवसेनेतील जास्त नगरसेवक असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवातून अद्याप न सावरलेल्या राठोड आणि शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांना हा धक्का मानला जातो. शिवसेनेतील अंतर्गत कलहाची एवढे दिवस झाकलेली मूठ या निवडणुकीच्या माध्यमातून उघड झाली आहेे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com