Friday, April 26, 2024
HomeUncategorizedधुळे : एसआरपीएफ जवान करोना बाधित

धुळे : एसआरपीएफ जवान करोना बाधित

धुळे – 

धुळे एसआरपीएफचा जवान कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. हा जवान मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेला होता.

- Advertisement -

दरम्यान, शहरासह जिल्ह्यात कोरोना व्हायरसने कहर केला असून या आजाराचे आणखी तीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या 24 तर साक्रीतील चार, शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येकी दोन बाधितांमुळे जिल्ह्यात एकूण 32 बाधित आढळले आहेत.

धुळ्याच्या एका ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र ते नाशिकमध्ये उपचार घेत आहेत. शहरातील साक्री रोडवरील जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयात एसआरपीएफच्या 82 जवानांची तपासणी करण्यात आली. हे जवान मालेगाव येथे 27 एप्रिल ते 1 मे पर्यंत बंदोबस्तासाठी गेलेले होते. श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाकडून अहवाल प्राप्त झाला असून त्यात एका जवानाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.

संबंधित जवानांना गडचिरोली येथे बंदोबस्तासाठी पाठविले जाणार आहे. म्हणून खबरदारी म्हणून त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. सद्य:स्थितीत संबंधित जवान जिल्हा पोलीस प्रशिक्षण केंद्रात असून त्यांना 21 दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे. पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यामुळे त्या जवानावर उपचार सुरु करण्यात आले आहे. असे एसआरपीएफ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

शहरातील आझादनगर क्षेत्रातील गरीबनवाज नगरमधील पुर्वीच कोरोना पॉझिटीव्ह तरुणाची 40 वर्षीय आई आणि 83 वर्षीय आजीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. तसा अहवाल सर्वोपचार रुग्णालयाकडून काल रात्री प्राप्त झाला आहे. तसेच हृदयावर बायपास शस्त्रक्रियेसाठी 27 एप्रिलला नाशिक येथे एका खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या गल्ली क्र. 6 च्या परिसरातील 65 वर्षीय कापड व्यावसायीकाला नाशिक येथे कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधिताचा आकडा 32 वर पोहचला आहे.

त्यापैकी धुळे शहरात सर्वाधिक 24, साक्रीत चार, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात प्रत्येकी दोन रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहे. धुळे शहरातील चार तर साक्रीतील दोघांचा असे एकूण सहा जणांचा कोरोना आजारामुळे मृत्यू झाला आहे.

महापालिका हद्दीत आठ प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाले असून ते प्रशासनाने सील केले आहेत. रुग्णालयातील कोरोना कक्षातील दोघांची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या