धुळे : गरोदर महिलेसह मृत कैदीही पॉझिटिव्ह

धुळे : गरोदर महिलेसह मृत कैदीही पॉझिटिव्ह

चौघांची करोनावर मात

शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात संशयित म्हणून उपचार घेणार्‍या एका गर्भवती महिलेला बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या कैद्याचा अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 66 झाली आहे.

या कैद्यासह आता जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 9 झाली आहे. तर 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. तसेच आज पुन्हा चार रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 22 वर पोहचला आहे. दरम्यान 51 अहवालची अद्याप प्रतीक्षा आहे.

शहरातील एक महिला प्रसूतीसाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाली होती. खबरदारी म्हणून चाचणीसाठी तिच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले होते. आज तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर दोन दिवसांपूर्वी एका तरुण कैद्याचा मृत्यू झाला होता.

चोरीच्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती. त्यांची दि. 13 रोजी प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारार्थ हिरे महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.

डॉ.भूपेश पाटील यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून डॉक्टरांनी त्याचे घशातील स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी घेतले होते.

धुळ्यात चौघांची कोरोनावर मात

जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत असली तरी या आजारातून बरे होणार्‍या रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे दिलासा मिळत आहे. आज आणखी चार रुग्ण करोनामुक्त झाल्याने आता बरे होणार्‍या रुग्णांची संख्या 22 झाली आहे. त्यात शहरातील 83 वर्षीय आजीबाईंसह तिची सून व नातू, असे तिघे व एक एसआरपीचा जवानाचा समावेश आहे. या चारही रुग्णांना दुपारी घरी सोडण्यात आले. 39 जणांची प्रकृती स्थिर आहे. रूग्ण बरे होत असल्यामुळे हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांसह कर्मचार्‍यांना कोरोनाविरुध्द लढण्याचे बळ मिळाले आहे. कोरोनावर मात करणार्‍या रुग्णांनी सर्व आरोग्य कर्मचार्‍यांचे मन:पूर्वक आभार मानले असून त्यांना आशीर्वाद दिले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com