मशिदीला कुलूप लावून सुरु होती नमाज
स्थानिक बातम्या

मशिदीला कुलूप लावून सुरु होती नमाज

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे. शिवाय सर्वच मंदिरे, प्रार्थनास्थळे देखील बंद करण्यात आले असून आपापल्या घरीच प्रार्थना करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. असे असतांनाही लॉकडाऊनचे उल्लंघन करुन जुन्या धुळ्यातील खुनी मशिदीत सामुहिक नमाज पठण होत असल्याचे निदर्शनास आले.

विशेष म्हणजे बाहेरुन या मशिदीला कुलूप लावून आत नमाज सुरु असल्याने पोलिसांनी कुलूप तोडून आतील सर्व जणांना बाहेर काढले. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून 36 जणांना ताब्यात घेतले. या शिवाय यात मशिद परिसरातून आज सकाळी बाहेर गावाहून आलेल्या एकाला ताब्यात घेतले आहे.

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न होत असून लॉकडाऊन कालावधीत विनाकारण बाहेर पडणार्‍या नागरिकांवर पोलिसांतर्फे कारवाई करण्यात येत आहे. अशा नागरिकांचे वाहने जप्त करुन त्यांच्याविरुध्द जमावबंदीचे उल्लंघन केल्या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मात्र अजूनही बहुतांशी नागरिक कोणत्यांकोणत्या कारणाने घराबाहेर पडत असल्याचे दिसते आहे. नागरिकांनीही आता सहकार्य करण्याची अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

राज्यराखीव पोलीस दल तैनात

शहरात राज्यराखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या जालन्याहून बोलविण्यात आल्या आहेत. चाळीसगावरोड पोलीस ठाणे, आझादनगर आणि देवपूर पुर्व व पश्चिम पोलिस ठाणेंतर्गत परिसरात या जवानांना तैनात करण्यात आले आहे. काल सायंकाळपासूनच त्यांनी आपल्या नेमून दिलेल्या ठिकाणांचा ताबा घेतला असुन रस्त्यावर दिसणार्‍या प्रत्येक नागरिकांची ते कसून चौकशी करीत आहेत. त्यांच्याकडे अत्यावश्यक कामाचे काही पुरावे आहेत काय? तेही बघितले जात आहे.

लॉकडाऊनचे उल्लंघन

सर्वत्र लॉकडाऊन असतांना आणि मंदिरांसह सर्वच प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश असतांना देखील जुन्या धुळ्यातील खुनी मशिदीमध्ये आज शुक्रवारची नमाज सामुहिकरित्या पठण होत असतांना आढळून आले. या मशिदीला बाहेरुन कुलूप लावून नमाज पठण करी असतांना आझादनगर पोलिसांनी कुलूप तोडून आतील सर्व जणांना बाहेर काढले. खबरदारी म्हणून 36 जणांना ताब्यात घेतले आहे.

त्यांचे रिपोर्ट आले निगेटीव्ह

दिल्लीतील तबलीगी संमेलनातून परतल्याच्या संशयावरुन काही जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणूने आहे. आजही काही जणांना ताब्यात घेतले आहे. असे असले तरी मुस्लीम समाजाकडे संशयाने बघू नका, मानवता जपा, कोरोनाशी सामना करण्यासाठी सामाजिक अंतर ठेवून नियमांचे पालन करा, विशेषत: कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत हे वारंवार करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com