Video : देशदूत संवाद कट्टा : मरावे परी अवयव रूपी उरावे
स्थानिक बातम्या

Video : देशदूत संवाद कट्टा : मरावे परी अवयव रूपी उरावे

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक | प्रतिनिधी

अवयव दानाने आपण मृत्यूनंतरही आपल्या अवयवाद्वारे अस्तित्व ठेवू शकतो. सर्वश्रेष्ठ असे हे दान असून आता मरावे परी अवयव रूपी मरावे असे म्हटले जात आहे. याबाबत सर्वसामान्यांमध्ये अद्यापही अनेक गैरसमज आहेत. यासाठी व्यापक जनजागृतीची तसेच या सर्वांचा समन्वय साधणार्‍या चांगल्या संस्थांची गरज असल्याचा सूर ‘देशदूत’च्या संवाद कट्ट्यात उमटला.

शहरातील अवयव दान, प्रत्यारोपण व जागृती करणार्‍या रुग्णालयांचे तज्ज्ञ डॉक्टर तसेच पोलिसांनी या कट्ट्यात आपली मते व्यक्त केली. यामध्ये हृषिकेश रुग्णालयाचे डॉ. भाऊसाहेब मोरे, मानवता क्युरी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. राज नगरकर, आयएमएचे माजी अध्यक्ष पंकज गुप्ता, त्वचा तज्ज्ञ डॉ. राजेंद्र नेहते, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार यानी सहभाग नोंदवला.

भारतीय संस्कृतीत दानाला फार महत्व आहे. याच दानामध्ये आपले शरिर तसेच शरीरातील इतर अवयव दान करणे हे आता सर्वश्रेष्ठ आहे. कारण या दानाद्वारे आपण मरतानाही दुसर्‍याला जीवन देत आहोत. ही भावनाच समाधान देणारी आहे. तर नातेवाईकांना सर्वाधिक पुण्य देणारी. परंतु केवळ गैरसमजामुळे तसेच माहितीच्या अभावामुळे अवयव दान करणारे दाते तसेच त्यांचे नातेवाईक पुढे येत नसल्याचे वास्तव आहे.

ज्या व्यक्तीचा मेंदू मृत झालेला असतो. अशाच व्यक्तीचे हृदय, लिव्हर, फुप्फुस हे अवयव दान करता येतात. मृत्यूनंतर कोणीही 6 तासांच्या आत डोळे तसेच त्वचा दान करू शकतात.तसेच संपूर्ण देह वैद्यकीय महाविद्यालयांना अभ्यासाठी दान करता येतात. तसेच आपण जिवंत असताना लिव्हरचा काही भाग, मूळपेशी तसेच किडनी तसेच गर्भाशय दान देऊ शकतो. आणि ज्याला दान दिले त्यासह आपणही आनंदी, आरोग्यदायी जीवन जगू शकतो.

ब्रेन डेड म्हणजे, अपघात अगर इतर करणांनी लहान मेंदूला मार लागल्यानंतर फुप्फुस काम करायचे थांबते. यावेळी हृदय सुरू असते. म्हणून रुग्णास व्हेंटिलेटरद्वारे श्वासोच्छवास दिला जातो. परंतु हा रुग्ण बरा होऊन कधीच घरी जाऊ शकत नाही. ब्रेन डेड होणे म्हणजे आयुष्याचा शेवटच, परंतु या व्यक्तीचे अवयव इतरांना जीवदान देऊ शकतात याचा सकारात्मक विचार अशा रुग्णांच्या नातेवाईकांनी करणे गरजचे आहे.

नाशिक हे अवयवदानाचे केंद्र ठरू लागले आहे. मागील वर्षभरात 21 नागरिकांनी संपूर्ण देह दान केला होता. ही संख्या आता 48 झाली आहे. तसेच भारतातील पहिले फ्रेश फ्रोजन कॅडेव्हल ट्रेनिंग सेंटर नाशकात झाले आहे. देश पातळीवर रक्तातून मूळपेशी दान करणारी दात्री संस्था कार्यरत आहे. त्याच प्रकारे इतर संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे.

आज जिल्ह्यासह देशभरात अवयव हवे असणारांची प्रतीक्षा यादी खूप मोठी आहे. मागणीच्या तुलनेत दाते उपलब्ध नसल्याने ही यादी वाढतच चालली आहे. अवयव दात्यांची संख्या वाढवण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे. यासाठी शासनासह अनेक सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन हे कार्य हाती घेण्याची गरज आहे.अनेकदा अवयव दानाचे अर्ज भरून दिले जातात. परंतु प्रत्यक्ष दात्यास रुग्णालयापयर्ंत अथवा गरजूपर्यंत पोहचवण्यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे आहेत.

शासकीय समिती करते मृत मेंदूची घोषणा

एखाद्या व्यक्तीचा मेंदू मृत झाला असला तरी संबंधित रूग्णालयाचे डॉक्टर वगळता शासनाने नियुक्त केलेली समिती विविध चाचण्या करूनच तज्ञ अखेरीस संबंधित व्यक्तीचा मेंदू मृत झाला किंवा नाही हे ठरवते. यानंतरच नातेवाईकही अवयव दानाचा निर्णय घेऊ शकतात. अवयव कोणत्या व्यक्तीने दिला. तो कोणत्या व्यक्तीला प्रत्यारोपित करण्यात आला याची गुप्तता राखली जाते. यामध्ये कोणताही आर्थिक फायद्याचा व्यवहार नसतो. यामुळे जनसामान्यांमध्ये रुणालय तसेच डॉक्टरांबाबत असलेले गैर समज दूर होणे गरजेचे आहे.

ग्रीन कॉरिडॉरची महत्त्वाची भूमिका

एखादा उपलब्ध झालेला अवयव तत्काळ दुसर्‍या शहरातील गरजूपर्यंत पोहचवणे आवश्यक असते. यासाठी वाहतूक यंत्रणेत सर्वात स्वस्त आणि महत्वाची अ‍ॅम्बुलन्स सेवा आहे. विमान तसेच हेलिकॉप्टरचा खर्च सामान्य नागरिकांना परवडणारा नसतो. अवयव घेऊन निघालेली अ‍ॅम्बुलन्स विना अडथळा व तत्काळ दुसर्‍या शहरात पोहचण्यासाठी पोलिसांच्या सहकार्याने होणारा ग्रीन कॅारिडॉरची भूमिका महत्त्वाची असते. पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांचा उत्तम समन्वयातून त्या मार्गावरील सर्व सिग्नल मॅन्युअल केले जातात. व पायलट व्हॅन अ‍ॅम्बुलन्सला मार्ग दाखवते. अशा ग्रीन कॉरिडॉर करण्यास पोलीस अधिकारी, कर्मचारी कायम उत्सुक असतात. तसेच यातून एक जीवदान मिळाल्याचे मोठे समाधान असल्याचे इनामदार यांनी स्पष्ट केले.

Deshdoot
www.deshdoot.com