देशदूत संवाद कट्टा : ऑनलाईन आर्थिक व्यवहारात जागरुकता गरजेची

देशदूत संवाद कट्टा : ऑनलाईन आर्थिक व्यवहारात जागरुकता गरजेची

सहभाग : पोलीस निरीक्षक दीपक देसले, अँँड. उर्जिता पटेल, सायबर तज्ञ तन्मय दिक्षित 

नाशिक | प्रतिनिधी

आर्थिक गुन्ह्यांमध्ये दररोजच ऑनलाईन पैसे अपहारात वाढ होत असून, याला मोठ्या प्रमाणात अज्ञानातून व्यवहार करणे कारणीभूत आहे. त्यामुळे कोणताही ऑनलाईन व्यवहार करताना त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेण्यासोबतच व्यवहार करताना जागरुकता बाळगणे गरजेचे असल्याचा सूर ‘देशदूत सारस्वत बँक संवाद कट्ट्या’तून उमटला.

दै. ‘देशदूत’च्या पुढाकाराने व सारस्वत बँकेच्या सहकार्याने ‘सायबर गुन्हेगारी व आर्थिक फसवणूक’ या विषयावर संवाद कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाशिक पोलिसांच्या सायबर शाखेचे उपनिरीक्षक दीपक देसले, सायबर गुन्हे प्रतिबंधक प्रशिक्षक तन्मय दीक्षित, सायबर गुन्हे विशेषज्ञ अ‍ॅड. ऊर्जिता पटेल, देशदूत डिजिटल विभागप्रमुख दिनेश सोनवणे हे होते.

यावेळी मान्यवरांनी सायबर गुन्हे व त्यांची व्याप्ती यावर सविस्तर माहिती दिली. साधारणत: आपल्या माबाईलवर येणारा ‘ओटीपी’ हा महत्त्वाचा भाग असला तरी हल्ली मोठ्या आकाराची वेब लिंक यात असते. त्यावर क्लिक करण्याची सूचना दिली जाते. यावर क्लिक केल्यास आपल्या खात्याचा थेट ‘अ‍ॅक्सेस’ आपण गुन्हेगारांना देत असतो. प्रत्येकाने आपल्या खात्याचा थेट संपर्क येऊन देण्यासाठी वेब वॉलेटमध्ये पैसे ठेवावेत व त्यातूनच व्यवहार करावेत. त्यामुळे थेट खात्याशी संपर्क येणार नाही.

बहुतांश वेळा ‘पैशांची लालसा, प्रेम व सेक्स या माध्यमातून फसवणूक केली जाते. कोणतीही मागणी नसताना लॉटरी कशी लागते, याबद्दल शंका येणे गरजेचे आहे. मात्र लालसेतून यात फसणार्‍यांचे प्रमाण जास्त आहे. आपल्या पालकांशिवाय कोणीच फुकट काही देणार नाही, याचे भान ठेेवणे गरजेचे आहे. प्रत्येक फुकट येणार्‍या गोष्टीवर शंका घेणे गरजेचे आहे. ऑनलाईनच्या प्रत्येक व्यवहारावर शंका घेणे गरजेचे आहे.

याबाबत जागरुकता बाळगताना फसवणूक झाल्याबरोबर 3 दिवसांच्या आत तातडीने बँकेत ‘डिस्प्यूट’ फॉर्म भरून नोंद करणे गरजेचे आहे. तसेच लगेचच पोलीस ठाण्यात नोंद करणे गरजेचे आहे. त्यासाठी झालेल्या व्यवहाराची व त्याबाबत झालेल्या संवादाचा तपशील देणे गरजेचे आहे. आपल्या कोणत्याही प्रक्रियेविना खात्यातून परस्पर पैसे गेले असल्यास तातडीने बँकेकडे नोंद केल्यास पैसे परत येण्यास मदत होईल. तसे न झाल्यास ग्राहक न्यायालयात दाद मागता येणार आहे.

ऑनलाईन गुन्ह्यांत वाढ

2017-18 दरम्यान 35 गुन्हे दाखल झालेले होते. ती संख्या 2018-19 दरम्यान 78 झाली होती. ती संख्या चालू वर्षात आत्ताच 38 ला पोहोचलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वागण्यासोबतच आपले पासवर्ड सातत्याने तपासणे गरजेचे आहे. बहुतांश लोक जन्मतारीख, मोबाईल नंबर पासवर्ड म्हणून ठेवतात. ते चुकीचे आहे. आपला पासवर्ड हा वेगळा तयार करणे गरजेचे आहे.
कोणताही व्यवहार करताना जागरुकता बाळगणे गरजेचे आहे. त्यातून आपल्या कष्टाच्या पैशांचा अपहार होणार नाही, यासाठी सातत्याने ऑनलाईन व्यवहार करताना बारकाईने अभ्यास करणे गरजेचे असल्याचा सूर या चर्चेतून उमटला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com