देवळा तालुक्यातील शिक्षकाचा शॉक लागून मृत्यू; अशोक स्तंभ परीसरातील घटना
स्थानिक बातम्या

देवळा तालुक्यातील शिक्षकाचा शॉक लागून मृत्यू; अशोक स्तंभ परीसरातील घटना

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

जानोरी | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील महात्मा फुले विद्यालय येथे कार्यरत असलेले प्रवीण नामदेव देवरे (वय ३८) यांचा विजेचा शॉक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. मृत शिक्षक हे देवळा तालुक्यातील उमराणे येथील असल्याचे समजते. त्यांच्या मृत्यूची घटना जानोरी आणि त्यांचे मुळगाव उमराणे परिसरात पसरल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अधिक माहिती अशी की, प्रवीण नामदेव देवरे (बी.एस.सी. बी.एड) हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे येथील रहिवासी आहेत. ते अशोकस्तंभ परिसरातील रॉकेल गल्ली मध्ये रूम घेऊन राहत होते. आज सकाळी पाणी गरम करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक कॉईलचा शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

ते रयत शिक्षण संस्थेमध्ये ते १७ फेब्रुवारी २०१४ रोजी रुजू झाले होते. रूजू झाल्यापासून ते जानोरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालय या शाखेत कार्यरत होते.

जानोरी विद्यालयात गणित व विज्ञान हे विषय ते शिकवत होते. गणित व विज्ञान विषयाचे गाडे अभ्यासक होते. तसेच विद्यार्थ्यांना गणिताविषयी आवड निर्माण करणारे व्यक्तिमत्व आणि एक शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व हरपल्याने जानोरीत खळबळ उडाली त्यांच्या जाण्याने जानोरी गावात शोककळा पसरली आहे.

अतिशय मनमिळावू व साधी राहणीमानाचे शिक्षक म्हणून त्यांची गावात ओळख होती. जानोरी गावात आज अचानक त्यांच्या निधनाची बातमी येताच सर्वांनाच धक्का बसला. नाशिक जिल्हा रुग्णालयात त्यांना नेले असता ते मयत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

त्यांचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून त्यांचा अंत्यविधी चा कार्यक्रम देवळा तालुक्यातील उमराणे या त्यांच्या मूळ गावी होणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com