Video : देवळा : मेशी गावानजीक भीषण अपघात; रिक्षा व बस विहिरीत कोसळली
स्थानिक बातम्या

Video : देवळा : मेशी गावानजीक भीषण अपघात; रिक्षा व बस विहिरीत कोसळली

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

21 प्रवाशी मृत्यूमुखी, 32 पेक्षा आधिक जखमी; मुख्यमंत्र्यांचे जखमींना मदत करण्याचे आदेश

नाशिक/मालेगाव/देवळा/वासोळ | प्रतिनिधी / वार्ताहर-  भरधाव एस.टी. बसचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बसने समोरून येत असलेल्या प्रवाशांनी भरलेल्या अ‍ॅपेरिक्षास धडक दिली. यानंतर बससह अ‍ॅपेरिक्षा रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील उघड्या विहिरीत जावून पडल्याने झालेल्या भीषण अपघातात बस व अ‍ॅपेरिक्षामधील 21 प्रवाशी मृत्यूमुखी पडले तर 32 पेक्षा अधिक प्रवाशी गंभीररित्या जखमी झाले. हा अपघात मालेगाव येथून कळवण येथे ही बस जात असताना मेशी फाट्याजवळ घडली. रात्री उशिरापर्यंत विहिरीचे पाणी उपसण्यात येवून मृतदेहांचा शोध घेण्याचे काम यंत्रणेतर्फे सुरू होते.

अपघातातील जखमींवर देवळा व मालेगाव येथील सामान्य रूग्णालयात उपचार केले जात आहे. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने एकच शोककळा पसरली आहे. 50 फुट खोल विहिरीत सुमारे 20 फूट पाणी असल्याने रिक्षा व त्यावर एस.टी. बस पडल्याने बहुतांश प्रवाशी एकमेकांवर पडून पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्याचे घटनास्थळाचे चित्र काळजाचा थरकाप उडवून देणारे ठरत होते.

मालेगाव येथून काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास धुळ्याहून मालेगाव-देवळामार्गे कळवणला जाणारी एस.टी. बस (एम.एच.06-एस-8428) ही बस दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मेशी गावालगत असलेल्या देशविदेश हॉटेलजवळील धोबी घाट शिवारातून मार्गक्रमण करत असतांना वळण रस्त्यावर अचानक बसचा टायर फुटला. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून मालेगावकडे येत असलेल्या अ‍ॅपेरिक्षा (एम.एच.15-डी.सी.-4233) ला बसने धडक दिली.

वेगात असलेली एस.टी. बस अ‍ॅपेरिक्षाला फरफटत 50 फूट ढकलत रिक्षासह 50 फुट खोल असलेल्या विहिरीत पडली. काही सेकंदातच हा थरार घडला. रिक्षासह बस विहिरीत कोसळताच प्रचंड आवाज झाल्याने मेशी फाट्यालगत असलेल्या हॉटेल देशविदेशवर थांबलेले देवळा येथील शिक्षक संजय सदाशिव देवरे, शेतमालक गणेश देवरे, कृउबा माजी सभापती राजेंद्र देवरे यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रिक्षाच्या पाठोपाठ एस.टी. बस देखील विहिरीत पडल्याने एस.टी. मधील प्रवाशांचा आक्रोश किंकाळ्या सुरू होत्या. नागरिकांनी तातडीने एस.टी. बसची पाठीमागील काच फोडून काही कार्यकर्ते दोरखंडासह बसमध्ये उतरले व त्यांनी जखमींना बाहेर काढण्यास प्रारंभ केला.

या घटनेची माहिती मिळताच देवळ्याचे आ.डॉ. राहुल आहेर यांच्यासह कळवणचे पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यास प्रारंभ केला. मालेगाव, सटाणा, देवळा, उमराणे व चांदवड येथील क्रेनसह रूग्णवाहिकांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. आ.आहेर यांनी देखील स्वत: बसमध्ये उतरून जखमींना बाहेर काढण्यास प्रारंभ केला.

पाण्यात पडलेल्या अपघातग्रस्त बसमधील दृष्य अंगाचा थरकाप उडवून देणारे होते. लहान मुले, महिला व पुरूष प्रवाशी एकमेकांच्या अंगावर पडून पाण्यात बुडाले होते. जखमी महिला, प्रवाशी सीटला धरून वर निघण्याचा प्रयत्न करत होते. बसमध्ये प्रवेश केलेल्या आ. आहेरसह कार्यकर्त्यांनी या जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यास प्रारंभ केला. तब्बल 27 ते 28 जखमींना तातडीने बाहेर काढण्यात येवून तातडीने रूग्णवाहिकांच्या सहाय्याने देवळा व मालेगावी सामान्य रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. एस.टी. काच फोडून कार्यकर्ते आत शिरल्यामुळेच अनेक जखमींचे प्राण वाचू शकले.

एस.टी. बसच्या खाली पाण्यात अ‍ॅपेरिक्षा बुडालेली असल्याने व रिक्षात देखील मोठ्या प्रमाणात प्रवाशी असल्यामुळे तीन क्रेनच्या सहाय्याने बसला काढण्याचे प्रयत्न पोलीस यंत्रणा व सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे केले गेले. विहिरीलगतच विजेचा खांब असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. तब्बल अडीच ते तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर साडेसहा वाजेच्या सुमारास एस.टी. बसला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले.

अंधार पडला असल्यामुळे मदत यंत्रणेस मोठे अडथळे उभे राहत होते. वीजपुरवठा खंडित असल्यामुळे बॅटरीच्या सहाय्याने पाण्यात बुडालेली अ‍ॅपेरिक्षा रात्री 8 वाजेच्या सुमारास बाहेर काढण्यात आल्यानंतर अ‍ॅपेरिक्षात प्रवाशांचे मृतदेह देखील मदत यंत्रणेतर्फे बाहेर काढले गेले. रात्री 8 वाजेपर्यंत 20 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. विहिरीत तब्बल 20 फूट असल्याने पाणी उपसण्यात येवून मृतदेहांचा शोध अग्निशमन दलाच्या जवानांतर्फे घेतला जात होता. या अपघातात एस.टी. बसच्या कळवण आगाराच्या महिला वाहक कमल लक्ष्मण राऊत (42) या देखील गंभीररित्या जखमी झाल्या.

या अपघातात ओळख पटलेल्या मृतांची नावे, अलका धोंडीराम मोरे (खर्डे), चंद्रभागाबाई मांगू उगले (सटवाईवाडी), शिवाजी गावीत (कळवण), अंकुश निकम (वाखारवाडी).

जखमींची नावे : देवळा रूग्णालयात दाखल करण्यात आलेले जखमी : धोंडू नारायण वाडेकर (63, रा. कळवण), वत्सलाबाई लक्ष्मण ठुबे (62, रा. मटाणे), ब्रम्हा विजय खानकरी (12, रा. कजगाव, जि. जळगाव), शेपी झुंबरे (21, रा. मध्यप्रदेश), कमल अशोक भामरे (60), कैलास उत्तम गिरी (57, रा. हरसवाडी, ता. कन्नड), मंगलाबाई भास्कर जाधव (41, रा. भिलवाड, ता. देवळा), योगिता भास्कर जाधव (20, रा. भिलवाड, ता. देवळा), रूचिता योगेश वनसे (6, रा. निंबायती, ता. मालेगाव), मिराबाई लक्ष्मण शेवाळे (60, रा. फुलेमाळवाडी, ता. देवळा), गजराबाई जंगलू मोरे (60), देवेंद्र नितीन मोरे (6), कमल अंकुश मोरे (10, सर्व रा. सोनगीर, ह.मु. कळवण), छाया विजय खानकरी (40, रा. कजगाव, जि. जळगाव), कल्पना दगडू राणे (42, रा. चाळीसगाव), वत्सलाबाई बाबुलाल दशपुते (60, रा. धुळे),
मालेगाव येथील सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेले जखमी – कमळाबाई बापू पवार (50, रा. देवळा), धोंडू दशरथ जाधव (60, रा. बिजोटे, ता. बागलाण), बायजाबाई धोंडू जाधव (50, रा. बिजोटे), दादाभाऊ दयाराम ह्याळीज (40, रा. देवळा), कमल लक्ष्मण राऊत (42, वाहक, कळवण), अनीता अमोल पाटील (25, रा. पाचोरा), अमोल पांडुरंग पाटील (31, रा. पाचोरा), अदित्य अमोल पाटील (साडेतीन वर्षे), आयुष अमोल पाटील (5), देविका दिपक बोरसे (3), दीपक बोरसे (30), सुनंदा दीपक बोरसे (25, रा. हिरापूररोड, चाळीसगाव).

काही सेकंदात मृत्यूचे थैमान
मालेगाव येथून देवळामार्गे कळवण येथे जात असलेली एस.टी. बस साडेतीन वाजेच्या सुमारास मेशी गावालगत असलेल्या वळणावरून भरधाव वेगाने पुढे जात असतांना एस.टी.चे टायर फुटल्याने मोठा आवाज झाला व बस पुढून येत असलेल्या रिक्षावर जावून धडकली व रिक्षास घेवून पुढे जात विहिरीत पडली. काही सेकंदातच काही कळण्याच्या आत हे मृत्यूचे थैमान घडले. बसमधील प्रवाशी खाली फेकले गेले. मानेपर्यंत पाण्यात आम्ही बुडालो होतो. रिक्षा तर एस.टी. बसच्या खाली पुर्णपणे पाण्यात बुडाली होती. दैवबलवत्तर होते म्हणून आम्ही बचावलो, अशी प्रतिक्रिया सामान्य रूग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी प्रवाशांनी दै.ङ्घदेशदूतफशी बोलतांना व्यक्त केली.

Deshdoot
www.deshdoot.com