पतंग उडवण्याच्या कारणातून नाशकात तुंबळ हाणामारी; गाड्यांची तोडफोड
स्थानिक बातम्या

पतंग उडवण्याच्या कारणातून नाशकात तुंबळ हाणामारी; गाड्यांची तोडफोड

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

इंदिरानगर । वार्ताहर

राजीवनगर येथे पतंग उडवण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात चारचाकी गाडीच्या पुढच्या काचा फोडून पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकींचे नुकसान करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (दि.15) दुपारी साडेचार वाजता राजीवनगर येथे जुन्या इंदिरानगर पोलिस ठाण्याजवळ असलेल्या सिंग डेंटल लॅबमध्ये रवींद्र भरत सिंग, शिवप्रताप हरिशरण सिंग, अतुल मिश्रा, राहुल भरतसिंग आदींसह कर्मचारी काम करत होते. त्यापैकी एक जण रस्त्यावर पतंग उडवत होता.

त्याचवेळी शेजारी राहणारा तन्मय पाटील आणि त्यांचे वडील प्रशांत पाटील यांनी येथे पतंग का उडवत आहेत असे विचारले. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यात सिंग यांची चारचाकी (एमएच 15 जीएफ 2109) च्या पुढच्या काचा फोडून मोठे नुकसान करण्यात आले. येथे लावलेल्या दुचाकीचे देखील नुकसान करण्यात आले.

अचानक झालेल्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली होती. प्रशांत पाटील यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी सर्वांना ताब्यात घेतले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Deshdoot
www.deshdoot.com