Friday, April 26, 2024
Homeनाशिक‘क्रेडाई शेल्टर-2019’ला आजपासून प्रारंभ; 100 विकासकांचे 500 प्रकल्प एकाच छताखाली

‘क्रेडाई शेल्टर-2019’ला आजपासून प्रारंभ; 100 विकासकांचे 500 प्रकल्प एकाच छताखाली

नाशिक । प्रतिनिधी

लाखो नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणार्‍या बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी व जुनी संस्था क्रेडाई नाशिकतर्फे उद्या गुरुवारपासून उत्तर महारष्ट्रातील सर्वात मोठ्या गृहप्रदर्शनाला डोंगरे वसतिगृह मैदानावर प्रारंभ होत आहे. यंंदा प्रदर्शनातून नाशिकच्या वैशिष्ट्यांवरील माहितीपटातून ब्रॅण्डिंग केले जाणार असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

गुरुवारी सायंकाळी 6 वाजता होणार्‍या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपसंचालक रामदास हेडकर आादी उपस्थित राहणार आहेत.

वॉव नाशिक, नाऊ नाशिक या संकल्पनेवर आधारित शेल्टर 2019 प्रदर्शन दहा एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरात 4 डोम्स तसेच प्रीमियम आणि खुल्या जागेवरील स्टॉल्समध्ये भरणार आहे. प्रदर्शनामध्ये 100 हून अधिक विकसकांचे 500 हून अधिक प्रकल्प, प्लॅटस्, प्लॉटस्, ऑफिसेस, फॉर्म हाऊस, शॉप, बांधकाम साहित्य, गृहसजावट तसेच आघाडीच्या वित्तीय संस्थांद्वारा कर्जाचे अनेक पर्याय एकाच छताखाली उपलब्ध असतील, अशी माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देशातील उत्तम हवामान, पाण्याची मुबलक उपलब्धता, नोकरी, व्यवसाय व शिक्षणाच्या अनेक संधी यामुळे नाशिकच्या तसेच अन्य शहरातील अनेक नागरिकांची नाशिकमध्ये घर घेण्याची तसेच गुंतवणूक करण्याची इच्छा असते. त्यातच विमान, रस्ते व रेल्वे यामुळे गत काही वर्षांत नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारदेखील नाशिकला पसंती देत असल्यचेही त्यांनी नमूद केले.

प्रदर्शनाचे सहसमन्वयक कृणाल पाटील म्हणाले, काही दशकांपूर्वी पारंपरिक व्यवसाय असलेल्या बांधकाम क्षेत्रास आता उद्योगाचा दर्जा मिळत असून यामुळे अनेक कुशल व अकुशल कामगारांना रोजगार मिळतो. बांधकाम क्षेत्रातील उलाढालीमुळे शहराच्या अर्थकारणातदेखील सकारत्मक बदल होतात, असेही त्यांनी नमूद केले. प्रदर्शनास भेट देणार्‍यांसाठी क्यूआर कोड तसेच संगणकीकृत प्रवेश राहणार असून वेगवेगळ्या किडस् झोन, फूड कोर्ट सहित माहितीपर विविध सेमीनारचे आयोजन शेल्टर-2019 प्रदर्शनात करण्यात येणार असल्याचे यांनी नमूद केले. प्रदर्शन 22 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

‘नाशिक पॅव्हेलियन’

भविष्यातील नाशिक कसे असेल याकरिता संकल्पना क्रेडाई राष्ट्रीयचे कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर आणि क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल यांच्या संकल्पनेतून ‘नाशिक पॅव्हेलियन’ उभारण्यात आले आहे. ते आकर्षण ठरेल, असा विश्वास समन्वयक रवी महाजन यांनी व्यक्त केला. नाशिक ब्रॅण्डिंसाठी महानगरपालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांना मोफत स्टॉल्स दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रदर्शनानिमित्त अनेक नव्या संधी, विशेष सवलतीचे दर, आकर्षक गृहकर्ज दर तसेच विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती महाजन यांनी दिली.

मनोरंजनात्मक कार्यक्रम

प्रदर्शनास भेट देणार्‍यांसाठी क्यूआर कोड तसेच संगणकीकृत प्रवेश राहणार असून वेगवेगळ्या किडस् झोन, फूड कोर्टसहित माहितीपर विविध सेमीनारचे आयोजनदेखील शेल्टर-2019 दरम्यान करण्यात येणार आहे. प्रदर्शनात चार दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असून त्यामध्ये ‘धुराळा’ चित्रपटातील कलाकारांचा चमू भेट देणार आहे. यासह सुरेल संगीताची मैफल आणि ‘चला हवा येऊ द्या’चे कलाकार यावेळी कला सादर करतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या