कोरोना वॉरीयर्स : अन्नदाता अर्थात आपला शेतकरी राजा

कोरोना वॉरीयर्स : अन्नदाता अर्थात आपला शेतकरी राजा

संपूर्ण जग सध्या विचित्र अशा संकटाचा सामना करतंय. न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती सर्वत्र आहे. कोणीच या संकटातून वाचलेलं नाही. प्रत्येकालाच आपल्या जिवाची काळजी पडलेली दिसतेय. कुणा अनोळखीच काय पण ओळखीच्या व्यक्तीपासून सुद्धा सर्वसामान्य माणूस चार हात अंतर ठेवून राहतोय. पण अशाही परिस्थितीत काही लोक मात्र देवदूता प्रमाणे अहोरात्र झटत आहेत, केवळ त्यांच्यामुळेच आपण या भयंकर संकटातही काही प्रमाणात निश्चिंतपणे दिवस काढतोय. अशा या सेवादूतांना सलाम करण्याचा हा छोटासा प्रयत्न…

सध्या सुट्टयामुळे सगळे घरातच आहेत त्यामुळे प्रत्येक घरात जणू वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवण्याची चढाओढ लागलीय. लॉक डाउन रेसिपीज ला बहर आलाय. रोज नवीन पदार्थ बनवायचा आणि स्टेटस ला टाकायचा हा तर आमच्या गृहिणींसाठी मोठा स्टेटस चा प्रश्न बनलाय.

नवनवीन पदार्थ खायला मिळतायेत म्हणून खाणारेही खुश आणि आपल्या पाककलेला दाद मिळतेय म्हणून बनवणारेही खुश. सगळ्या घरांमध्ये थोडयाफार फरकाने हेच दृश्य दिसतंय. पण विचार करा हे सगळे पदार्थ बनवण्यासाठी लागणार अन्नधान्य येत कुठून?

अस म्हणतात सैन्य पोटावर चालत, कितीही मोठं संकट आलं तरी पोटाला खायला मात्र लागताच. माणूस एक दिवस उपाशी राहील, दोन दिवस राहील परंतु अन्नाशिवाय फार दिवस जगणं त्याला शक्य नाही. सध्याच्या कठीण परिस्थतीत समाजासाठी झटणारे सर्व डॉक्टर्स, पोलीस आणि अजूनही बरेच लोक त्या सगळ्यांना वेळेवर जेवणखाण मिळाले तरच ते आपली सेवा उत्साहाने पार पाडू शकतील.

हे अन्नाचे दोन घास आपल्या मुखी पडण्यासाठी अहोरात्र शेतात खपणारा आपला सगळ्यांचा अन्नदाता म्हणजे आपला शेतकरी मित्र, त्याला विसरून कसं चालेल बरं? या अटीतटीच्या परिस्थतीत आजही आपल्या देशाकडे सहा ते आठ महिने पुरेल एवढा धान्यसाठा आहे, तरी घाबरून जाऊ नका असे आपले राज्यकर्ते सांगत आहेत ते कुणाच्या भरवशावर?

विचार करा जवळपास सव्वाशे कोटी जनतला पुरेल एवढा अन्नसाठा आणि तो ही सहा महिन्यांकरिता. खरंच किती दिलासादायक गोष्ट आहे ही. लॉक डाऊन मुळे सगळ्या सेवा बंद असताना आपला शेतकरी दादा मात्र आपली सेवा अखंडपणे बजावतोय. कारण शेतकरी थांबला तर सर्वच थांबेल. या एक दीड महिन्याच्या काळात अजूनही आपल्या पानात भाजीपाला येतोय, पोळी भाकरी खायला मिळतेय. विचार करा हळूहळू हे पदार्थ आपल्या ताटातून गायब व्हायला लागले तर?

तस झालं नाहीये याचाच अर्थ आजही कुणीतरी त्याच्यासाठी राबतय. ऐन रबी पिकांच्या कापणीचा मौसम आणि हे कोरोनाच संकट दारात उभं राहिलं, उभं पीक शेतात जळून जातंय की काय या विचाराने हा शेतकरी राजा धास्तावला, अशाही परिस्थतीत शेतीची काम करत राहिला. संकट तर त्याच्या पाचवीलाच पुजलेली आहेत, कधी दुष्काळाचं सावट तर कधी अतिवृष्टीचा तडाखा, कधी अवकाळी मुळे होणार पिकांचं नुकसान तर कधी बाजारात मालाला भाव नाही.

प्रत्येकवेळी त्याच नुकसान ठरलेलं. आर्थिक नुकसान तर आहेच पण केलेल्या कष्टाचं काय मोल?  विचार करा एखाद्या सुगृहिणीने दिवसभर राबून उत्तम स्वयंपाक केला, आणि खाणाऱ्याच्या मुखापर्यंत न जाता तो वाया गेला तर किती दुःख होईल तिला, मग वर्षभर राबून शेतात पिकवलेलं सोन किंवा भाजीपाला असा रस्त्यावर फेकून देताना किती यातना होत असतील त्या बळीराजाला?

या लॉक डाउन च्या संकटामुळे माल शहरापर्यंत पोहचू च शकला नाही त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांना आपला माल शेताच्या बांधावर फेकून द्यावा लागला, कित्येकांनी भाजीपाला किंवा फळांच्या बागेत गुरांना चरायला सोडून दिलं तर कित्येकांनी अतिशय कमी दरात किंवा अगदी मोफत सुद्धा आपला माल गरीबांना वाटून टाकला.

यात त्यांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई करणार कोण? विमानसेवा बंद असल्याने निर्यात सुदधा बंद झालीये. उत्पन्नाचे सगळे शाश्वत मार्ग बंद झालेत तरी तो लढतोय. आपल्या देशबांधवांच्या मुखात दोन घास पडावेत म्हणून झटतोय. बरेच शेतकरी आता घरोघरी धान्य , भाजीपाला, फळे स्वतःच नेऊन पोचवताय. या कठीण परिस्थितीत कुणी उपाशी राहू नये म्हणून मेहनत करतायेत.

कधी कधी आपल्याला भीती सुद्धा वाटते हा दारावर येणारा भाजीपाला घ्यायची पण मला वाटत योग्य काळजी घेऊन त्यांच्याकडून खरेदी करायला काय हरकत आहे?तेवढाच त्यांनाही दिलासा.

या शेतकरी दादाबरोबरच अजूनही अनेक जण आहेत जे आपल्या मुखात घास पाडण्यासाठी आजही सेवारत आहेत. आपल्या आजूबाजूचे छोटे मोठे व्यापारी, भाजीवाले, फळवाले ,किराणा दुकानदार, दुधविक्रेते. कृषी क्षेत्राला मदत करणारे व्यापारी, खत, बी बियाणे, शेतीच्या अवजारांचे विक्रते. एक ना अनेक  बाकी सगळं बंद आहे. पण, त्यांची सेवा मात्र अखंड चालू आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून यांचं काम अविरत चाललंय.

अशावेळी लहानपणी शिकलेला एक श्लोक आठवतो,
कृषिवल कृषीकर्मी
राबती रातदिन
करुनि स्मरण त्यांचे
अन्न सेवा खुशाल
आज गरज आहे पानातील प्रत्त्येक घास खाताना या अन्नदात्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची. त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्याची
म्हणूनच म्हणावसं वाटत
हे अन्नदाता , कृषिवला तुमच्या महान सेवेमुळॆच आम्ही आजही तग धरून आहोत.
सलाम तुमच्या कष्टांना!
सलाम तुमच्या मेहनतीला!
आम्ही आपले कायम ऋणी राहू.

तनुजा सुरेश मुळे /मानकर, नाशिक (लेखिका ब्लॉगर आहेत)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com