मालेगावचे आमदार मौलाना मुफ्ती ‘होम क्वॉरंटाईन’
स्थानिक बातम्या

मालेगावचे आमदार मौलाना मुफ्ती ‘होम क्वॉरंटाईन’

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मालेगाव ।  प्रतिनिधी

नवी दिल्ली येथे जमीयत उलमा कार्यालयासह एका कार्यक्रमात हजेरी लावून आलेल्या येथील मालेगाव मध्यचे आ. मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना 14 दिवस घरातच होम क्वॉरंटाईन राहण्याचा सल्ला वैद्यकिय पथकातर्फे तपासणीअंती देण्यात आला आहे.

निजामुद्दीन येथील तबलीगी जमातच्या मर्कजमध्ये सहभागी झालेल्यांना करोना विषाणूची लक्षणे दिसून येत आहे. मात्र आ. मौलाना मुफ्ती यांचा सहभाग या मर्कजमध्ये नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

17 दिवसापुर्वी आ. मौलाना मुफ्ती हे दिल्ली येथे जमीयत कार्यालय तसेच एका धार्मिक कार्यक्रमात हजेरी लावून आले होते. याची माहिती मिळाल्यानंतर आज आज सकाळी मनपा वैद्यकिय अधिकारी डॉ. भिमराव त्रिभुवन यांच्यासह चार डॉक्टरांच्या पथकाने आ. मौलाना मुफ्ती यांच्या निवासस्थानी जावून त्यांच्या प्रकृतीची तपासणी केल्यानंतर त्यांना 14 दिवस होम क्वॉरंटाईन राहण्याचा सल्ला दिला. या वृत्तास वैद्यकिय अधिकारी त्रिभुवन यांनी दुजोरा दिला आहे.

दरम्यान, आपण दिल्ली येथे 17 दिवसापुर्वी गेलो होतो. तबलिगी जमात मर्कजमध्ये गेलो नाही. जमीयतच्या कार्यालयात मदरशाच्या कामानिमित्त तसेच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. मालेगावी येवून आपणांस 17 दिवस झाले असून या काळात कुठलाही त्रास आपणांस झाला नाही.

आज वैद्यकिय पथकाने अकस्मात येवून आरोग्य तपासणी केल्यानंतर 14 दिवस होम क्वॉरंटाईन राहण्याचे सांगितले असल्याचे आ. मौलाना मुफ्ती यांनी पत्रकारांशी वार्तालाप करतांना सांगितले.

विदेशातून आलेल्या सहा जणांना होम क्वॉरंटाईन

साऊथ अफ्रिकेतील डरबन येथे धार्मिक कार्यक्रमात उपस्थित राहून आलेल्या सहा जणांना होम क्वॉरंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात सदर सहाही जण विदेशातून येथे आले होते. त्यांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली असून त्यांची प्रकृती चांगली असली तरी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्यांना होम क्वॉरंटाईन राहण्याचे सांगण्यात आले आहे. पोलीस, महसुल व वैद्यकिय पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याचे अ.पो. अधिक्षक संदीप घुगे यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com