Saturday, April 27, 2024
Homeनाशिककरोना बाधीत भागातील व्यक्तीना नाशिक मनपा क्षेत्रात ‘नो एन्ट्री’

करोना बाधीत भागातील व्यक्तीना नाशिक मनपा क्षेत्रात ‘नो एन्ट्री’

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात बाहेरील राज्यातून आणि इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींमुळे नाशिक महापालिका क्षेत्रात करोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. नाशिक शहरात सामाजिक संपर्कातून कोणालाही संसर्ग झालेला नाही. हे लक्षात घेता नाशिक शहरात चोरट्या पध्दतीने व मार्गाने प्रवेश करणार्‍या व्यक्तींवर कडक कारवाई करावी असे महापालिका प्रशासनाकडुन शहर पोलीस आयुक्तांना कळविण्यात आले आहे.

- Advertisement -

शनिवारी नाशिक शहरात आढळून आलेल्या सहा रुग्णांपैकी काही जण तालुका व जिल्हा बंदी असतांना चोरट्या पध्दतीने व चोरट्या मार्गेने शहरात आल्याचे समोर आले आहे.

यात भडगांव (जि. जळगांव) येथील व्यक्ती दुधाच्या टॅकरने नाशिक शहरात आली होती. नाशिक ग्रामीण पोलीस दलात असलेला पोलीस हा रात्री एका टँकरने नाशिक शहंरात दाखल झाला होता. तसेच एक करोना बाधीत वृध्दा लॉकडाऊन असतांना चिंचनगांव (ता. मालेगांव) येथे गेल्यानंतर नाशिकला सातपूर कॉलनीत परतली होती.

अशाप्रकारे नाशिक शहरात आता करोना बाधीत भागातून व्यक्ती येत असल्याचे समोर आले आहे. परंतु नाशिक शहरात सामाजिक संपर्कातून कोणालाही करोनाची लागण झालेली नसल्याचे नागरिकांनी घाबरुन जावू नये. करोना बाधीत भागातून शहरात येणार्‍या लोकांना किंवा त्यांच्यामुळे इतरांना करोनाची लागण होत आहे.

याची दखल घेत महापालिका प्रशासनाने तात्काळ शहर पोलीसांना कळविले आहे. शहरात अशापध्दतीने गैरमार्गाने किंवा करोना बाधीत प्रदेशातून येणार्‍या नागरिकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मनपा प्रशासनाने शहर पोलीसांकडे केली आहे.

शहर पोलीसांकडुन नाकाबंदी – तपासणी

शहरातील करोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी शहर व ग्रामीण पोलीसांनी तालुका व जिल्हा बंदीचे कडक पालन करावेत, ज्यामुळे या साथीला अटकाव बसेल अशी अशी मागणी महापौर सतिश कुलकर्णी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने शहर आयुक्तांना देखील कळविले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता शहर पोलीस यंत्रणा संतर्क झाली आहे. शहरात येणारे मोठे राज्य, महामार्ग, जिल्हा मार्ग सोडुन इतर लहान मार्गावर शहर पोलीसांनी वाहन तपासणीचे काम हाती घेतले आहे. शनिवारी रात्री आडगांव पोलीसांनी सिध्द प्रिंपी रोडवर अहिल्यामाता लेन भागात नाकाबंदी व वाहन तपासणीचे काम केले. यात मालेगाववरुन किंवा इतर जिल्ह्यातून येणार्‍या प्रवाश्याची तपासणी केली.

पोलीस मुख्यालयात आरोग्य तपासणी

शहरात गेल्या काही दिवसात करोनाचा प्रादुर्भाव रोकण्यात मनपा प्रशासनाला यश आल्यानंतर आता बाहेरुन आलेल्या व्यक्तीमुळे शहरातील करोना बाधीतांचा आकडा वाढत गेला आहे. यात नाशिक ग्रामीण दलातील पोलीसांना मोठ्या प्रमाणात लागण झाली असुन हा आकडा 4 डझनाच्यावर गेला आहे. यातील बहुतांशी पोलीस हे महापालिका हद्दीत राहणारे आहे. हे कर्मचारी बंदोबस्तासाठी मालेगांवला गेलेले असल्याने त्यांचा कुटुंबाशी संपर्क आला नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र महापालिकेने त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू केली आहे. त्याचबरोबर पोलीस राहत असलेले सीबीएसजवळील पोलीस मुख्यालय, आडगांव येथील ग्रामीण पोलीस मुख्यालय आणि पाथर्डी फाटा भागातील पोलीस मुख्यालयात आता पोलीसांच्या कुटुबांची आरोग्य तपासणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या