नाशिक : ट्विटरवर ‘दिवे’ लावणे भाजप पदाधिकाऱ्याला भोवले; ओझर पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिक : ट्विटरवर ‘दिवे’ लावणे भाजप पदाधिकाऱ्याला भोवले; ओझर पोलिसांत गुन्हा दाखल

file photo 

नाशिक | प्रतिनिधी 

‘थाळी बजाव नंतर लोक काय दिवे लावतील, याचा विचार पण भयावह आहे..संकट काय, सुरुये काय…अशा आशयाची पोस्ट महिला पत्रकाराने सोशल मीडियात अपडेट केल्यानंतर नाशिकच्या भाजप सोशल मीडिया प्रमुखाने यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. दरम्यान, महिला पत्रकाराच्या तक्रारीनंतर ओझर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, पंतप्रधान मोदींनी काल (दि.०३) सकाळी नऊ वाजता देशातील जनतेला संबोधित करत येत्या रविवारी (दि. ५) रोजी रात्री नऊ वाजता घरातील सर्व लाईट्स बंद करून दिवा, मेणबत्ती, मोबाईलचे फ्लॅशलाईट लावण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदींच्या आव्हानावर मुंबईतील एका महिला पत्रकाराने ‘थाळी बजाव नंतर लोक काय दिवे लावतील, याचा विचार पण भयावह आहे..संकट काय, सुरुये काय…अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियात पोस्ट केली होती.

या पोस्टवर नाशिकच्या भाजप पदाधिकारी असलेल्या विजयराज जाधव याने आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. यावर संतप्त झालेल्या युजर्सने नाशिक ग्रामीण पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. थोड्याच वेळात महिला पत्रकाराने ई-मेलने रीतसर तक्रार पाठविली. यानंतर ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, भाजपा सोशल मिडियाचे महाराष्ट्र प्रमुख प्रविण अलई यांनी दिलगिरी व्यक्त करत ती व्यक्ती भाजपाची  पदाधिकारी नसल्याची सारवासारव केली. मात्र, यानंतर जाधवने आक्षेपार्ह ट्वीट काढून टाकले. नाशिक ग्रामीण पोलिसांनी स्क्रीनशाॅटवरून विजयराज जाधव विरोधात ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

रात्री उशिरा देवळा पोलिसांच्या मदतीने जाधव यास ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, श्वसनाचा आणि रक्तदाब वाढल्यामुळे जाधव यास नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी ‘देशदूत’शी बोलताना दिली.

दरम्यान, आपण दिलेल्या तक्रारीनुसार तात्काळ दखल घेण्यात आली असुन ओझर पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित संशयितास अटक करण्यात आली आल्याचे ट्विट ग्रामीण पोलिसांनी केले आहे. जाधव याच्या विरोधात महिलांची बदनामी करणे, मानहानीकारक संदेश पाठवणे व आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत.

गुन्हा दाखल केल्यानंतर सोशल मीडियात व्यक्त होताना किमान बदनामी करू नये, टीका करताना मर्यादा ओलांडू नये इतकीच अपेक्षा आहे! अशी प्रतिक्रिया या महिला पत्रकाराने दिली व नाशिक ग्रामीण पोलिसांचे आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com