वैद्यकीय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की भोवली; एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती यांच्यासह १० जणांवर गुन्हा

वैद्यकीय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की भोवली; एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती यांच्यासह १० जणांवर गुन्हा

मालेगांव | प्रतिनिधी

देशभरात संचारबंदी असतांना काल (दि.२५)  रात्री ८ वाजेच्या सुमारास मालेगांव मध्य चे आमदार मौलाना मुफ्ती मो. यांच्या समवेत २० ते २५ राजकीय कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलचे वैद्यकिय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांच्याशी हुज्जत घालत धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी डॉ. डांगे यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, काल रात्री ८ वाजता, सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या दोघा संशयीत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. सामान्य रुग्णालय पुर्ण क्षमतेने कार्यरत असतांना आमदार मौलाना मुफ्ती मो. ईस्माईल हे रुग्णालयात आले.

यावेळी त्यांच्या समवेत सुमारे २० ते २५ राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होते. यामध्ये प्राध्यापक रिजवान अमानुल्ला खान अजमल अन्सारी, नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी, नईम अहमद,

युसुफ इलियास यांचा समावेश होता. हे सर्वजन अनाधिकाराने  वैद्यकिय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांच्या दालनात शिरले. तेथे त्यांनी आरडाओरड व मोठमोठ्या आवाजात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यामुळे रुग्णालयातील इतर महिला व पुरुष डॉक्टर्स, वॉर्डबॉय, नर्सेस भयभीत झाल्या.
आमदारांसोबतच्या काही कार्यकर्त्यांनी यावेळी डॉ. डांगे, डॉ. पाटील यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. यामुळे भयभीत झालेल्या रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी काम बंद करुन रुग्णालयासमोर ठिय्या मांडून होत असलेल्या अन्यायाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हा ठिय्या कर्मचाऱ्यांनी मागे घेतला.  हा सर्व प्रकार यावेळी रुग्णालयात बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांदेखत झाला. आ. मौलाना व त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या दहशतीपुढे ते ही काही करु शकले नाही.

कोरोना चे संशयीत रुग्ण रुग्णालयात दाखल असतांना तसेच संचारबंदीचा आदेश असतांना आमदार महोदयांसमवेत इतका मोठा जमाव रुग्णालयात घुसतोच कसा असा सवाल यावेळी उपस्थित होत होता.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असताना असा प्रकार घडल्यामुळे आमदार मुफ्ती मोहम्मद यांच्यासह समर्थकांवर भा द वी ३५३, ३३२ ३४१, ३४२, ४१२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com