राज्य वकील परिषदेची जोरदार तयारी; न्यायालयात रंगरंगोटीने सजल्या इमारती
स्थानिक बातम्या

राज्य वकील परिषदेची जोरदार तयारी; न्यायालयात रंगरंगोटीने सजल्या इमारती

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । प्रतिनिधी

येथे होणार्‍या राजस्तरीय वकील परिषदेची जोरदार तयारी जिल्हा न्यायालयात सुरू असून विविध मंडप उभारणीसह परिसरातील सर्वच इमारती रंगरंगोटीने खुलल्या आहेत.

महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या वतीने जिल्हा न्यायालय आवारात राज्यस्तरीय वकील परिषदेचे आयोजन केले आहे. 15 व 16 फेब्रुवारी ही परिषद होणार आहे. यावेळी जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या कामाचे उद्घाटन होणार आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते या वकील परिषदेचे उद्घाटन होणार आहे; तर इमारतीच्या भूमिपूजनासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या समवेत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह 4 मंत्री असणार आहेत. तसेच सर न्यायाधीशांंसमवेत सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत.

या सर्व समारंभाची जिल्हा न्यायालय आवारात जोरदार तयारी सुरू आहे. इमारतींच्या सुशोभिकरणाचे कामे झपाट्याने सुरू आहेत. कोर्टाच्या आवाराचा चेहरामोहरा बदलला असून, वकील परिषदेचेही तयारी जय्यत सुरू आहे.

वकील परिषदेचे शनिवारी (दि.15) सांयकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बोबडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई असतील. कार्यक्रमास अ‍ॅड. तुषार मेहता (सॉलिसिटर जनरल), अ‍ॅड. अनिल सिंग (एडिशनल सॉलिसिटर जनरल), अ‍ॅड. आशुतोष कुंभकोणी (अ‍ॅडव्होकेट जनरल), अ‍ॅड. ए. एन. एस. नाडकर्णी (एडिशनल सॉलिसिटर जनरल), अ‍ॅड. मननकुमार मिश्रा (अध्यक्ष बार कौन्सिल ऑफ इंडिया) यांची सुद्धा विशेष उपस्थिती राहणार आहे. परिषदेला महाराष्ट्रासह गोव्याचे मिळून सुमारे साडेतीन हजार वकील उपस्थिती लावणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com