सहाव्या मजल्यावर केवळ मुख्यमंत्री बसणार?
स्थानिक बातम्या

सहाव्या मजल्यावर केवळ मुख्यमंत्री बसणार?

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मुंबई | प्रतिनिधी 

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या राज्य मंत्रिमंडळात सध्या मुख्यमंत्र्यांसह ७ मंत्र्यांची निवड करण्यात आली. या मंत्र्यांना कोणती दालने मिळणार याबाबत उस्तुकता निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दालनाशेजारी असलेल्या दालनात कोणताच मंत्री बसण्यास तयार नसल्याने सध्यातरी ६ व्या मजल्यावर फक्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे दालन राहणार आहे.

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीला आग लागल्यानंतर त्याचे नुतनीकरण करण्यात आले. इमारतीच्या नुतनीकरणानंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनाशेजारील दालन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले होते. मात्र कालांतराने अजित पवार यांच्या व्यक्तव्याची वादग्रस्त व्हीडीओ क्लीप उघडकीस आल्याने त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

त्यानंतर २०१४ साली राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनाशेजारी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना देण्यात आले होते. या सरकारला वर्ष दिडवर्षाचा कालावधी होताच महसूल मंत्रीपदी असलेल्या एकनाथ खडसे यांच्या विरोधातील भूखंड वाटप आणि कथित दाऊद इब्राहीम यांच्याशी कथित संभाषण केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने त्यांनाही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागल्याची घटना संबध महाराष्ट्राने पाहिली.

एकनाथ खडसे यांच्यानंतर भाजपाचे अजातशत्रु असलेले पांडूरंग फुडकर यांना कृषीमंत्री म्हणून हे दालन देण्यात आले. परंतु मंत्रीपदाची धुरा वाहत काही महिन्यांचा कालावधी लोटत नाही. तोच त्यांचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर हे दालन नवे कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांना देण्यात आले. त्यांचा तर विधानसभेच्या निवडणूकीत पराभव होवून तूर्त तरी राजकारणातून बाहेर फेकले गेले.

त्यामुळे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्येही ६ मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या शेजारील दालन नकोच अशीच भूमिका घेतल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

विद्यमान परिस्थितीत मुख्य इमारतीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे ६ व्या मजल्यावर दालन राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री जयंत पाटील यांनी विस्तारीत इमारतीतील दालन स्विकारले आहे. राष्ट्रवादीचे आणखी नेते छगन भुजबळ यांना मुख्य इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर दालन देण्यात आले आहे.

तर शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांना विस्तारीत इमारतीतील ३ रा मजल्यावर, मंत्री सुभाष देसाई यांना ५ व्या मजल्यावर, काँग्रेस मंत्री बाळासाहेब थोरात यांना विस्तारीत इमारतीतील पहिल्य़ा मजल्यावर आणि काँग्रेस मंत्री डॉ.नितीन राऊत यांना मुख्य इमारतीतील ४ मजल्यावर दालन देण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com