उध्दव ठाकरेंचे स्वागत : महंत नृत्य गोपालदास

उध्दव ठाकरेंचे स्वागत : महंत नृत्य गोपालदास

अयोध्या। कुंदन राजपूत

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले म्हणून अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यास काही संत महात्म्यांनी विरोध केला असला तरी श्रीराम जन्मभूमी न्यासचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास महाराज यांनी ठाकरे यांच्या दौर्‍याचे स्वागत केले आहे. त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

ठाकरेंच्या दौर्‍याला संताचा विरोध आहे?

ठाकरे हे रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. त्यांचे अयोध्येत स्वागत आहे. रामाचे दर्शन घेण्याचा सर्वांना अधिकार आहे. राम सर्वांचा आहे. ज्यांना विरोध करायचा त्यांनी करावा.

ठाकरे यांनी रायगडच्या मातीचा कलश दिला होता?

राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. अयोध्येत लवकरच भव्य मंदिर उभारले जाईल. ठाकरे यांनी मागील दौर्‍यात रायगडावरील मातीचा कलश माझ्याकडे दिला होता. मंदिर पायाभरणीत ही माती वापरली जाईल.

राम मंदिराची किती कालावधीत उभारणी होईल?

राम मंदिर हा हिंदूचा आस्थेचा विषय आहे. न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निर्णय दिला. येत्या काळात देशभरातील साधू महंतांच्या उपस्थितीत राम मंदिराचे भूमिपूजन केले जाईल. पुढील सहा महिन्यात भव्यदिव्य राम मंदिर उभारले जाईल.

पुढील काळात युपीच्या निवडणुका आहेत. पुढे लोकसभा आहे. राम मंदिराच्या मुद्दयाचे राजकारण केले जात आहे ?

देशाचा इतिहास पाहिला तर राम मंदिर हा आजचा मुद्दा नाही. बाबरने मंदिर पाडले तेव्हापासूनचा हा विषय आहे. मागील चार शतकापासून साधू महंत राम मंदिरासाठी लढा देत आहेत.तेव्हा देशात कुठे निवडणुका होत्या. हा राजकीय मुद्दा कसा होऊ शकतो. राम मंदिराला राजकारणात घुसवू नका.

अयोध्येत यापुढे शांतता कायम राहिल ?

मागील 60 वर्षाहून अधिक काळ हा मुद्दा न्यायालयात होता. अखेर विवादित मशीद हिच रामजन्मभूमी असल्याचा निकाल न्यायालयाने दिला. राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला. अयोध्या व देशातील मुस्लिमांनी या निर्णयाचे स्वागत केले. अयोध्येत आता हिंदू व मुस्लिम असा कोणताही वाद नाही.समाजात भाई चार्‍याचे वातावरण आहे. मुस्लिम समाजाचे नेते व लोक मला भेटतात. राम मंदिर उभारणीत त्यांचे देखील योगदान राहिल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com