कसबे सुकेणेच्या शेतकऱ्याने मोफत वाटले गहू; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, छगन भुजबळ यांनी मानले आभार

कसबे सुकेणेच्या शेतकऱ्याने मोफत वाटले गहू; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, छगन भुजबळ यांनी मानले आभार

नाशिक | प्रतिनिधी 

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे आता करोना या विषाणूजन्य रोगाने शेतकऱ्यांचा पिच्छा सोडलेला नाही, अशाही परिस्थितीत शेतकरी स्वतःचे नुकसान सोसत गरिबांना मदत करण्यास नेहमीच पुढे येत आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे निफाड तालुक्यातील कसबे सुकेने येथील दत्ता रामराव पाटील भंडारे या युवा शेतकऱ्याने आपला पिकविलेला गहू गरिबांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

दरम्यान, शेतकऱ्याने उचललेल्या या पावलावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आभार व्यक्त केले आहेत.

देशभरात कोरोना व्हायरसमुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. देशभरातील ऑफिसेस, कंपन्या, कारखाने बंद असल्याने पोटावर हात असल्याने कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

नाशिक जिल्ह्यातील आणि निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथील शेतकरी दत्ता राम पाटील यांची तीन एकरात शेतजमीन आहे. त्यांनी या तीन एकरात गहूचे पिक घेतले आहे.

या तीन एकरमधील एक एकरात पिकलेले गहू दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी एक एकरातील गहू गरजू व्यक्तींना दान केले आहेत.

ते म्हणतात, ‘मी एक छोटा शेतकरी आहे. आम्ही आर्थिकदृष्ट्या सधन नाही पण आमच्याकडे एक चपाती आहे तर त्यातील अर्धी चपाती आम्ही गरजवंतांना देऊ शकतो’, असे दत्ता राम पाटील यांनी सांगितले.

याबाबतची बातमी दैनिक देशदूतने काल प्रसिद्ध केली होती. त्यानंतर एका वृत्तसंस्थेचे ट्विटला रीट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दत्ता पाटील यांचे आभार व्यक्त केले. ‘माणूसकीच आपल्याला या युद्धात जिंकण्यासाठी मदत करू शकते. दत्ता राम पाटील जी या कार्यासाठी तुमचे आभार’, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून पोस्ट करण्यात आले आहे.

तर शासनासोबतच आपणही आपले कर्तव्य समजून सामाजिक भान ठेवत नाशिक जिल्ह्यातील युवा शेतकरी पाटील यांनी निराधार कुटुंबाना आपल्या शेतातील गहू मोफत उपलब्ध करून दिला.

त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यातून समाजापुढे जो आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. याबाबत भुजबळ यांनी दत्ता रामराव पाटील यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क करत त्यांच्या या उपक्रमाबद्दल कौतुक करून आभार मानले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com