Friday, April 26, 2024
Homeनाशिकमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यतेसाठी आता जिल्हास्तरीय कार्यालय

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यतेसाठी आता जिल्हास्तरीय कार्यालय

नाशिक । प्रतिनिधी 

दुर्धर आजार तसेच प्राणांतिक अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना उपचारासाठी शासनाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीची मदत करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन केला आहे.फडणवीस सरकारच्या काळात सुरु केलेल्या या कक्षाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय विद्यमान सरकारने घेतला असून मंत्रालयातील मुख्य कक्षासोबतच नागपूर येथील विशेष कक्षात जाण्याची गरज रुग्नांना पडू नये यासाठी प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी हे कक्ष स्थापन केले जाणार आहेत. यासंबंधीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकर करणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्यासह  तसेच देशाच्या विविध भागातील  आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत देणे हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत अर्थसहाय्य पुरवले जाते. याशिवाय समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी देखील या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जात आहे. अनेक दुर्धर आजारावरील उपचारांच्या खर्चासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य्यता निधी कक्ष कार्यान्वित आहे. हृदयरोग, गंभीर अपघात, कर्करोग यासंबंधित उपचारांसाठी आर्थिक दुर्बल कुटुंबातील रुग्णांना दोन लाखांपर्यंतची मदत या कक्षामार्फ़त दिली जाते.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत मिळवण्यासाठी मंत्रालयातील मुख्य कक्षासह नागपूर येथे फडणवीस सरकारच्या काळात विशेष कक्ष कार्यान्वयीत करण्यात आला आहे. या दोन ठिकाणी गरजू रुग्ण अर्ज सादर करून योजनेचा लाभ घेत आहेत. मुंबई आणि नागपूर या दोनच ठिकाणी सहाय्यता कक्ष असल्याने रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना या दोन ठिकाणी हेलपाटे मारावे लागत असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जिल्हास्तरावर स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यतील जनतेसाठी हा दिलासादायक निर्णय असून मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात अंमलबजावणी करण्यात येत असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. जिल्हास्तरावर मदत कक्ष सुरु होणार असल्याने गरजू रुग्णांना त्यांच्या जिल्हयातुनच अर्ज दाखल करणे सोयीचे असणार आहे. वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडे येणाऱ्या अर्जांना स्वतः मुख्यमंत्री मंजुरी देतात. त्याचा लाभ आतापर्यंत राज्यातील लाखो रुग्णांनी घेतला आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी न मिळाल्यामुळे प्रियांका गुप्ता या महिलेने गेल्या आठवड्यात मंत्रालयात  आत्महत्येचा प्रयत्न केली होता. तिचा पती गेले काही वर्षांपासून आजारी आहे.

त्यांच्या उपचारांचा खर्च हाता बाहेर गेल्यामुळे तीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात दिरंगाई होत असल्यामुळे तिने हे पाऊल उचलले होते. रुग्नांना आवश्यक उपचारांसाठी वेळेवर निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडून जिल्हास्तरावर वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरु करण्याची सूचना देण्यात आली.

हे. याशिवाय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाकडे मदतीसाठी प्राप्त होणार्‍या अर्जाची स्थिती रुग्णांना समजण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सूचनेनुसार एसएमएस सेवा सुरू करण्याबाबत देखील कार्यवाही सुरू असल्याचे मुख्यंमत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. आता अर्जावर 8 दिवसांच्या आत कार्यवाही होईल आणि एसएमएस सेवाही देण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या