आरोग्य विज्ञान विद्यापीठाला कुसुमाग्रजांचे नाव द्या; काँग्रेस सेवादलची मागणी: सीएमला निवेेदन

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

आरोग्य विज्ञान विद्यापीठाला कवीश्रेष्ठ व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांचे नाव दिले जावे, अशी मागणी काँग्रेस सेवादलाकडून करण्यात आली आहे. सेवादलाचे नाशिक शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांनी मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा नामांतराचा वाद सुरू असताना आरोग्य विज्ञान विद्यापीठाचेही नामकरण केले जावे, ही मागणी पुढे येत आहे. नाशिकमधील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नामांतराला त्यामुळे तोंड फुटले आहे. युती सरकारमध्ये डॉ. दौलतराव आहेर आरोग्यमंत्री असताना त्यांनी नाशिकचे ऋण फेडत, या ठिकाणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना केली. 3 जून 1998 ला विद्यापीठाची स्थापना झाली.

राज्यभरातून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. मागील भाजप सरकारकडून या विद्यापीठाला स्व. डॉ.दौलतराव आहेर यांचे नाव देण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, काही कारणास्तव हा नामांतराचा प्रस्ताव बारगळला होता. कोल्हापूर विद्यापीठाच्या नामांतरानंतर आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे देखील नामांतर केले जावे, अशी मागणी जोर धरत आहे. काँग्रेस सेवादलने या विद्यापीठाला कवीवर्य कुसुमाग्रज यांचे नाव दिले जावे, अशी मागणी केली आहे. या मागणीचे पत्र राज्यपाल भगतसिंह कोशारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *