चंद्रकांत पाटील पुन्हा प्रदेशाध्यक्ष; भाजपमधील इच्छुकांची निराशा

चंद्रकांत पाटील पुन्हा प्रदेशाध्यक्ष; भाजपमधील इच्छुकांची निराशा

मुंबई । प्रतिनिधी

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदावर डोळा असलेल्या राज्यातील भाजपच्या नेत्यांची निराशा झाली आहे. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोथरूडचे आमदार चंद्रकात पाटील यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. तर, मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांनाच कायम ठेवण्यात आले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज याबाबत घोषणा केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप क्रमांक एकच पक्ष म्हणून पुढे आला होता. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाही मोठा वाटा होता.

मात्र, राज्यात सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. सत्ता गमवावी लागल्यानंतर भाजपमध्ये संघटनात्मक बदलांची चर्चा सुरू झाली होती.

विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारले गेलेले विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक लढूनही पराभूत झालेल्या पंकजा मुंडे हे नाराज नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक होते.

त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार, याविषयी उत्सुकता होती. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे व अमित शहा यांचे विश्वासू मानल्या जाणार्‍या पाटील यांच्याच गळ्यात पुन्हा ही माळ पडली आहे.

तसेच, मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांनाच कायम ठेवण्यात आले आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेसशी महाआघाडी केल्याने मुंबईच्या अध्यक्षपदी मराठी चेहरा दिला जावा, अशी अपेक्षा पक्षात व्यक्त होत होती. शिवसेनेला जशास तसे उत्तर देणार्‍या आशिष शेलार यांनाच हे पद मिळेल, असेही बोलले जात होते. मात्र, ती अपेक्षाही फोल ठरली आहे. आमदार लोढा यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.

नजीकच्या काळात घटनात्मक रचना पुन्हा नीट करण्याचे मोठे आव्हान आहे. अचानक गेलेल्या सरकारमुळे जी मरगळ आली, ती झटकून कार्यकर्ते पुन्हा एकदा कसे जोमाने कामाला लागतील, हे पाहणार आहे.आमचे सरकार नाहीये, त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून सक्षम भूमिका कशी बजवावी, यासाठी प्रयत्न करायचा आहे. ठाकरे सरकारने आधीच्या सरकारची प्रत्येक गोष्ट करण्याचा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रद्द करताय तर पर्याय द्या.

– चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com