जिल्हा व तालुका दूध संघांतील 27 नियुक्त्या रद्द; जिल्ह्यातील दोघा अशासकीय सदस्यांचा समावेश

नाशिक । प्रतिनिधी

राज्यातील 27 जिल्हा आणि तालुका दूध उत्पादक संघांवर करण्यात आलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या शासनाने रद्द केल्या आहेत. यात नाशिकमधील दोघांचा समावेश असून जिल्हा दूध संघाचे कैलास हाळनोर आणि सिन्नर तालुका दूध संघाचे भागवत सापनर यांच्या नियुक्त्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या तरतुदीनुसार ज्या सहकारी संस्थांमध्ये शासनाचे भागभांडवल किंवा हमी, कर्ज, अनुदान, शासकीय जमीन या स्वरूपात शासनाचे सहाय्य असणाऱ्या गृहनिर्माण संस्था वगळून इतर संस्थेच्या बाबतीत संचालक मंडळामध्ये एक शासकीय अधिकारी आणि एक खाजगी व्यक्ती यांना संचालक म्हणून नियुक्त केले जाते.

खाजगी किंवा अशासकीय व्यक्तीच्या नियुक्तीसाठी सहकारातील अनुभव तसेच शैक्षणिक पात्रता शासनाने निर्धारित केलेली आहे. याच तरतुदीच्या आधारे राज्यातील सुमारे 27 जिल्हा आणि तालुका सहकारी दूध उत्पादक संघांच्या संचालक मंडळावर नेमणूक करण्यात आलेल्या 27 अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या सहकार विभागाकडून रद्द करण्यात आल्या आहेत, कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा, बारामती तालुका, संगमनेर तालुका दूध संघांचा यात समावेश आहे. नाशिक जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे कैलास मुरलीधर हाळनोर व सिन्नर तालुका विभागीय सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाचे भागवत नाना सापनर यांच्या नियुक्तांचा देखील यात समावेश आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *