जुने नाशकातून ‘एनआरसी’ विरुध्द सह्यांची मोहीम सुरू; थंडीत हजारो आंदोलक रस्त्यावर
स्थानिक बातम्या

जुने नाशकातून ‘एनआरसी’ विरुध्द सह्यांची मोहीम सुरू; थंडीत हजारो आंदोलक रस्त्यावर

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

जुने नाशिक | प्रतिनिधी

शहरातील संविधानप्रेमी नागरिकांच्यावतीने केंद्र सरकारच्या सिटीझन अमेंडमेंट ऍक्ट तसेच एनआरसी व एनपीआर विरोधात आंदोलनाची नव्याने सुरूवात करण्यात आली आहे. शहरातील विविध भागात सह्यांची मोहीम राबविण्यात येऊन एक लाख सह्यांचे पत्र देशाचे मुख्य न्यायाधीश यांना पाठविण्यात येणार आहे. याची सुरूवात आज जुने नाशिकच्या चौक मंडई येथून करण्यात आली. सायंकाळी 6 पासून सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली. तत्पुर्वी झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन हा काळा कायदा कशाप्रकारे आपल्या देशाच्या संविधानाविरुध्द आहे, याबद्दलची माहिती दिली.

यावेळी जहांगीर मशिदीचे इमाम मौलाना सय्यद शरीफ अशरफी, कथडा दुधाधारी मशिदीचे इमाम मौलाना सय्यद आसीफ, राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शेलार, राजू देसले, किरण मोहीते, आसीफ शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय सचिव सोहेल काझी, रशीद चांद, एजाज काझी, असलम खान, जगमोहन सिंग, अजीज पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. कडक थंडीतही हजारो आंदोलन रसत्यावर बसले होते. सर्वधर्मीय पुरूष, महिला व तरुणांनी स्वयंस्फुर्तीने भाग घेतला. चौक मंडई वाकडी बारव येथे भव्य फलक लावण्यात आला होता.

कार्यकर्त्यांनी हातात तिरंगा झेंडा घेतला होता. केंद्र सरकार देशाच्या संविधानाला बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याने संविधानप्रेमी नाशिककरांच्यावतीने एक लाख सह्यांचे पत्र देशाचे मुख्य न्यायाधीश यांना पाठविण्यात येणार आहे. तसेच सीएए व एनआरसीमुळे होणार्‍या दुष्परिणामाबद्दल संविधानप्रेमी लोकांमध्ये सतत जनजागृती करीत आहे. यामुळे सतत आंदोलनाला पाठिंबादेखील वाढत आहे.

आज (दि.2) जुने नाशिकमधून सुरू झालेली सह्यांची मोहीम पुढे देखील विभागनिहाय सुरू राहणार आहे. 11 दिवसात 1 लाख सह्या घेण्याचे नियोजन असून 5 जानेवारी सायं. 5.30 वा. नाशिकरोड येथील राजराजेश्‍वरी चौकात, 6 रोजी शिवाजी चौक नवीन नाशिक, 7 रोजी वडाळागांव, 9 रोजी सातपूर, 10 रोजी नाशिक पश्‍चिम विभागात तर 11 जानेवारी 2020 रोजी पंचवटीत सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व ठिकाणी सायंकाळी 5.30 वा. आंदोलनाला सुरुवात होणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com