नंदुरबार : महिलेची ७३ लाखात फसवणूक ; बामखेडा येथील पाटील दाम्पत्याविरुद्ध गुन्हा
स्थानिक बातम्या

नंदुरबार : महिलेची ७३ लाखात फसवणूक ; बामखेडा येथील पाटील दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

Rajendra Patil

नंदुरबार | प्रतिनिधी

भागीदारीत पेट्रोलपंप चालविण्याचे आमिष दाखवून खोटा करारनामा करुन महिलेची ७३ लाख ९ हजार ९२० रुपयांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी बामखेडा ता.शहादा येथील पाटील दाम्पत्याविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बामखेडा ता.शहादा येथील सुवर्णा किशोर पाटील हिच्या नावे कृष्णा पेट्रोलियम नावाचा पेट्रोल पंप आहे. तो भागिदारीने चालवता येत नाही, असे माहिती असूनही त्यांनी व त्यांचे पती किशोर दशरथ पाटील यांनी मोठया नफ्याचे आमिष दाखवून संगिता प्रमोद पाटील व त्यांचे पती यांना बेकायदेशीरपणे पेट्रोलपंप भागीदारीचे बनावट व खोटा करारनामा करुन देवुन अर्थिक फसवणूक केली.

दि.३ नोव्हेंबर २०१८ पासून आजपर्यंत  यापोटी वेऴोवेऴी पेट्रोलपंपाच्या कामासाठी पैसे लागणार आहेत असे सांगुन संगिता पाटील यांच्याकडून त्यांनी त्यांच्या आयडीबीआयच्या बँक खात्यावर वेऴोवेळी अशी ७३ लाख ९ हजार ९२० रुपये भरणा केले. मात्र, संगीता पाटील यांना पेट्रोलपंपातील विक्रीचा कोणताही लाभ मिळाला नाही. म्हणून संगीता पाटील यांनी पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली.

त्यामुळे संगिता पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सारंगखेडा पोलीस ठाण्यात पाटील दाम्पत्याविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६७, ४६८, १२० ब, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सरोदे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com