जळगाव : कोरोना रुग्णाची माहिती सोशल मिडीयावर प्रसारित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा – जिल्हाधिकारी

jalgaon-digital
3 Min Read

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) –

जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचे नाव व तपासणी अहवाल सोशल मिडीयावर प्रसारित करणा-या अज्ञाताविरुध्द तातडीने गुन्हा दाखल करावा. तसेच संबंधितांचा शोध जिल्हा सायबर सेलने लवकरात लवकर घ्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिलेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या व करावयाच्या उपाययोजनांची जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील, महानगरपालिका आयुक्त सुशील कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटोडे, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त य. कों. बेंडकुळे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, पोलीस उप अधिक्षक दिलीप पाटील, उपनिबंधक सहकारी संस्था मेघराज राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात काल एक कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळून आला असून या रुग्णाचे नाव व तपासणी अहवाल सोशल मिडीयावर प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले असून ही अतिशय गंभीर बाब आहे. असे करणा-याविरुध्द तातडीने गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. तसेच यापुढे याप्रकारची माहिती तसेच अफवा पसरविणारे संदेश पसरविणाऱ्यांवर पोलीस विभागाने कठोर कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.

त्याचबरोबर जिल्ह्यात परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची तपासणी झाली आहे का याबाबतची खात्री करावी. तसेच मुंबई व पुण्याहून आलेल्या नागरीकांमध्ये कोरोना सदृश काही लक्षणे आढळून येत असल्यास त्यांचीही तातडीने तपासणी करावी. तातडीची उपाययोजना म्हणून जिल्हा सामान्य रुगणालयात 5 ॲम्बुलन्स ठेवण्यात याव्यात. तसेच संशयितांचे नमुने तपासणीस पाठविण्याकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयाला अजून दोन वाहने उपलब्ध करुन द्यावे. जेणेकरुन तपासणी नमुने तातडीने पोहोच करता येतील.

शाहू महाराज रुग्णालयात दोन सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावेत. रुग्णालयात नातेवाईकांना प्रवेश बंद करण्यात यावात. रुग्णांना चहा, नाश्ता व जेवण देण्याची व्यवस्था करावी. पोलीसांनी भाजीपाला व फळे विक्रेत्यांच्या हातगाडया जमा करु नये. गर्दी टाळण्यासाठी आवश्यकता भासली तर सिंधी कॉलनीतील मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर दुधाचे भाव कमी करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहे. तेव्हा शासन दरापेक्षा दुधाचे भाव कमी होणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यावी.

कोरोना पॉझिटीव्ह सापडलेल्या रुग्णांचे नातेवाईकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले आहे. तो राहत असलेल्या परिसरात महानगरपालिकेचे कर्मचारी समुपदेशन करीत आहे. तसेच या परिसरात गर्दी होवू नये याकरीता पोलीस लक्ष ठेवून आहेत. सदरचा रुग्णांने ज्या रेल्वे प्रवास केला त्याचा सविस्तर तपशील रेल्वे प्रशासनास देण्यात येवून त्याच्या सोबत प्रवास केलेल्या प्रवाशांची तपासणी करुन घेण्याचे आवाहन संबंधित नागरीकांना रेल्वे प्रशासनाने करावे अशा सुचनाही जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिल्यात.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *