स्थानिक बातम्या

जळगाव : मेहरुण तलावात आढळला भाजीपाला विक्रेत्याचा मृतदेह

Rajendra Patil

जळगाव | प्रतिनिधी
मेहरुणमधील रामेश्‍वर कॉलनीतील तीन दिवसांपासून बेपत्ता भाजीपाला विक्रेता सुकदेव धोंडू भंडारे (वय २७) या अविवाहित तरुणाचा मृतदेह मेहरुण तलावात गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आढळला.

हा तरुण रामेश्‍वर कॉलनीतील बहिणीकडे भावासह राहत होता. तो काही महिन्यांपूर्वी घरात काहाही न सांगता शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी निघून गेला होता. त्यानंतर तो चार दिवसांनी घरी परतला. तो आताही असाच कुठे तरी निघून गेला असावा, काही दिवसांनी घरी येईल, असा समज त्याची बहीण, भाऊ व इतर नातेवाईकांचा झाला.

त्यामुळे तो हरवल्यासंदर्भात पोलिसात खबर दिलेली नव्हती. सुकदेव धोंडू भंडारे याचा भाऊ पांडुरंग हा गुरुवारी सकाळी साडेसात वाजता एमआयडीसीतील कंपनीतील कामावरुन घरी आला. यावेळी त्याने मेहरुण तलावात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याची चर्चा गल्लीत ऐकली. तीन दिवसांपासून भाऊ देखील बेपत्ता आहे, म्हणून तो तत्काळ तलावाकडे गेला.

पाण्यावर तरंगणारा मृतदेह आपलाच भाऊ सुकदेवचा असल्याचे स्पष्ट झाले आणि पांडुरंगने आक्रोश केला. घटनास्थळी नातेवाईक पोहचले आणि मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. वैद्यकीय सुत्रांनी सुकदेवला मृत घोषीत केले.

दुपारी शवविच्छेदन होऊन त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. याबाबत जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख यांनी खबर दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. तपास उपनिरीक्षक विशाल सोनवणे व शिवदास चौधरी करीत आहेत. मृत सुकदेव भंडारे याच्या पश्‍चात बहीण, भाऊ असा परिवार आहे. त्याच्या आईचा मृत्यू सुमारे २० वर्षांपूर्वी, तर वडिलांचा मृत्यू १० वर्षांपूर्वी झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com