जळगाव : खडसे-फडणवीस-महाजन यांची एकत्र बैठक
स्थानिक बातम्या

जळगाव : खडसे-फडणवीस-महाजन यांची एकत्र बैठक

Balvant Gaikwad

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-खडसे जैन हिल्सवर

जळगाव (प्रतिनिधी)-

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर तिघेही आज एकत्र पाहायला मिळाले.

जळगाव दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ खडसे यांनी भेट घेतली. यावेळी गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित होते. जळगावातील जैन इरिगेशनच्या गेस्ट हाऊसवर ही मोठी राजकीय भेट झाली. यावेळी तिघांनीही एकत्र न्याहरी केली

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी जळगावात आगमन झालं. यावेळी भाजपचे सर्व आमदार खासदार फडणवीस यांच्या भेटीला आले होते. मात्र एखनाथ खडसे हे उपस्थित नव्हते.

खडसे हे फडणवीसांच्या स्वागताला उपस्थित नव्हते मात्र त्यांनी फडणवीसांची भेट घेणार असल्याचं कळवलं होतं. एकनाथ खडसे हे भेटीला येणार असल्याचं समजताच फडणवीस यांनी हेलिकॉप्टरचे उड्डाण 20 मिनिटे उशिरा केले.

२० मिनीटे एकत्र चर्चा

खडसे, महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास 20 मिनिटे एकत्र बसून चर्चा केली. देवेंद्र फडणवीस हे जळगावातून नंदुरबारला जाणार आहेत. त्यापूर्वी तिघांची बैठक झाली. या बैठकीत खडसेंची नाराजी दूर करण्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.

आपलं तिकीट का कापलं? तसंच कन्या रोहिणी खडसे यांच्या पराभवाला भाजपमधीलच एक गट कारणीभूत आहे, त्यांच्यावर कारवाई कधी करणार? असे प्रश्न खडसेंनी उपस्थित केले आहेत.

त्या प्रश्नांची उत्तरं खडसे यांना देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याकडून अपेक्षित होती. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळेच आपले तिकीट कापल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी काल केला होता.

खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत-महाजन

खडसेंच्या या गंभीर आरोपानंतर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली होती. या आरोपानंतर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यात आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद नाहीत. मागच्याच आठवड्यात खडसे आणि मी मुंबईत एकाच ताटात जेवलो. मात्र, माध्यमांनीच या विषयाचा विपर्यास केला, असे स्पष्टीकरण दिलं होतं.

देवेंद्र फडणवीस पहाटे 4.30 ला जळगावात आले. फडणवीस हे धुळे आणि नंदुरबारला जाणार आहेत. जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या  निवडीबाबत चर्चा झाली. याबाबत आमच्या तिघांची चर्चा झाली. जिल्हा परिषद निवडणुकीची चर्चा झाली. आम्ही एक आहोत, एकत्र निवडणुकीला सामोरे जाऊ, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

मी टोकाचं बोललो नव्हतो असं खडसे साहेबांनी काल सांगितलं होतं. माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला असं खडसेंनी सांगितलं मलाही ते बोलले.

जिल्हा परिषद निवडणुकीबाबत कोअर कमिटीची बैठक झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष – उपाध्यक्ष निवडणुकीबाबत आम्ही एकमताने नावं ठरवली आहेत, असंही महाजन यांनी सांगितलं.

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा- खडसे

जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा झाली. उमेदवार ठरवणं बाकी होतं. प्रदेशाध्यक्षांकडे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांची नावं पाठवली होती.

विरोधी पक्षनेते फडणवीसांची चर्चा करुन निर्णय घ्यावा. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नावावर चर्चा केली. नाराजीचा विषय वेगळा, हा विषय वेगळा आहे. आज केवळ उमेदवारीवर चर्चा झाली. उमेदवार ठरवले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धुळ्याला सभा आहे. तात्पुरते जळगावला थांबले. तिथून धुळ्याला गेले मग नंदुरबारला जातील.

आजचा विषय केवळ अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीवर होता. आज आमची नाराजीबाबत चर्चाच झाली नाही, माझं पूर्वीपासून जे मत होतं, ते आजही कायम आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. दरम्यान बैठक आटोपल्यानंतर फडणवीस पत्रकारांशी न बोलताच हेलिकॉप्टर ने नंदुरबार कडे निघाले तर महाजन आणि खडसे हे मात्र एकाच वाहनातून जैन हिल्स येथून बाहेर पडले .

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-खडसे जैन हिल्सवर

दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचेसोबत न्याहरी करून माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि माजी मंत्री, आमदार गिरीष महाजन हे जैन हिल्स वरून एकाच वाहनातून कोल्हे हिल्सकडे रवाना झाले. भाजपाचे सर्व जिल्हा परीषद सदस्य कोल्हे हिल्सला मुक्कामी असून जिल्हा परीषदेत जाण्यापूर्वी खडसे व महाजन हे सर्व सदस्यांशी चर्चा करणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com