Wednesday, April 24, 2024
Homeनगरपाथर्डी : नांदूर निंबादैत्य येथे गोळ्या झाडून सरपंचाची हत्या ; राजकीय वादातून...

पाथर्डी : नांदूर निंबादैत्य येथे गोळ्या झाडून सरपंचाची हत्या ; राजकीय वादातून घटना

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) –  तालुक्यातील भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदूर निंबादैत्य या गावात राजकीय वादातून दोन गटांत झालेल्या गोळीबारात सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. मंगळवार दि. 17 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

या घटनेतील जखमींना अत्यवस्थ अवस्थेत नगरला उपचारासाठी हलविण्यात आले असून या घटनेत ज्ञानेश्वर अशोक दहिफळे (वय 30) हे गंभीर जखमी झाले आहेत. भीमराज जिजाबा दहिफळे (वय 60), सदाशिव अर्जुन दहिफळे (वय 50) हे किरकोळ जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.

- Advertisement -

यासंदर्भात समजलेली माहिती अशी, की या घटनेतील मृत सरपंच संजय दहिफळे यांचे गावातीलच निवृत्त जवान शहादेव उर्फ पम्प्या पंढरीनाथ दहिफळे यांच्याशी राजकीय वैर होते. या दोघांमध्ये पूर्वी अनेकदा वाद झाले होते. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास गावातीलच स्व. गोपीनाथ मुंडे चौकात दोन्ही गटांत मारामारी झाली. त्यात शहादेव दहिफळे यांनी आपल्याकडे असलेल्या रिवॉल्व्हरमधून सरपंच संजय दहिफळे यांच्या छातीत दोन गोळ्या झाडल्या.

यावेळी झालेल्या मारामारीत सरपंच संजय दहिफळे यांच्या गटाचे ज्ञानेश्वर दहिफळे यांच्या डोक्याला जबर मार लागला तर भीमराज दहिफळे व सदाशिव दहिफळे यांना किरकोळ मार लागला. सर्व जखमींना गावातीलच काही तरुणांनी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता मोठी गर्दी जमा झाली होती.

वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद गर्जे यांनी संजय दहिफळे व ज्ञानेश्वर दहिफळे यांच्यावर प्रथमोचार करून अत्यवस्थ अवस्थेत नगरला पुढील उपचारासाठी पाठवले. दरम्यान सरपंच संजय दहिफळे यांचा मृत्यू झाला. या घटनेने निंबादैत्य नांदूर येथे तणावपूर्ण वातावरण असून घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी घटनास्थळी दाखल झाले. आरोपीस रात्री उशीरापर्यंत अटक केली नव्हती.

- Advertisment -

ताज्या बातम्या